औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखानदारांचा प्रताप

बोईसर : तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांकडून प्रदूषण सुरूच आहे. रात्रीच्या वेळी घातक रसायने कारखान्याबाहेरील नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कारखान्यांनी घातक रसायन आणि सांडपाणी प्रक्रिया करूनच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडणे बंधनकारक आहे. तरीही,  रसायने उघडय़ा नाल्यात सोडण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित विभागाकडून जबाबदार कंपनीविरोधात कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औद्योगिक वसाहतीतील नाले दिवसा कोरडे असतात. मात्र, रात्री ते  प्रदूषित सांडपाण्याने ओसंडून जात असल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरू लागल्या आहेत. तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रातील  इ ६२/६३ या प्लान्टमदील बजाज हेल्थकेअरच्या कारखान्यातून बाहेर असलेल्या नाल्यात आणि औद्योगिक क्षेत्राचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडले जात असल्याचे उघडकीस आले आहे. अंधाराचा फायदा घेऊन मोठय़ा प्रमाणात रसायनिक सांडपाणी नाल्यात सोडून दिले जात आहे. याबाबतची एक चित्रफित समाजमाध्यमांवर समोर आला आहे.

जुन्याच नावाने नोंद

बजाज हेल्थ केअर कारखान्यातून घातक रसायन सोडले गेले तो कारखाना प्लान्ट क्रमांक इ-६२/६३ याठिकाणी आहे. हा कारखाना पूर्वी इ- ६२ वेटफार्मा नँटरो प्रोडक्ट या नावाने होता तर इ- ६३ हा कारखाना जवाना केमिकल या नावाने होता. मात्र कारखान्यासमोर पाटी आता बदलण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जुन्याच नावाने कारखान्यांची नोंद आहे.