सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने विदर्भातील जनजीवन पार विस्कळीत केले. ओदिशा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भातील पाऊसबळींची संख्या ८ झाली आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्य़ाला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. दणकेबाज पावसाने शहरांच्या महापालिका आणि नगर पालिकांच्या पावसाळी नियोजनाचे अक्षरश: वाभाडे काढले. रस्त्यांवरील पाणी घरात शिरून हजारो वस्त्या जलमय झाल्या. खोलगट भागांना याचा जबर तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. आज सकाळी घरांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे आणि रस्त्यांवरील झाडे बाजूला सारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
अनेक जिल्ह्य़ांमधील नद्यांना पूर आले आहेत. यवतमाळातील धरणे ओव्हरफ्लो झाली असून भंडारा जिल्ह्य़ातील राष्ट्रीय प्रकल्प म्हणविल्या जाणाऱ्या गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे शेवटच्या क्षणी उघडावे लागले. विदर्भातून जाणाऱ्या काही महामार्गावरील वाहतूकही पाण्याने ठप्प केली. वाईट हवामानामुळे विमानांच्या उड्डाणांनाही विलंब झाला. पाणी साचल्याने नागपूर-तुळजापूर महामार्ग क्रमांक ३६१, तसेच भामरागड-आलापल्ली, एटापल्ली-कसनसूर, भिवापूर-चंद्रपूर आणि चिमूर हिंगणघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. पाणी ओसरल्यानंतर आज या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
नदी आणि नाल्यांनी घेरलेल्या यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील ७०० घरांना पुराने वेढा घातल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. पुराचे पाणी अद्यापही पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यासाठी आणखी काही दिवस जाऊ द्यावे लागतील. वाकनलाही पुराचा वेढा असून पाच घरे वाहून गेली आहेत. तब्बल १८ तास अखंड कोसळलेल्या पावसाने विदर्भात ८ जणांचे बळी गेले. नागपुरात मंगळवारी वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह आज सापडले. भिवापुर तालुक्यात दोन लहान बहीणभाऊ शौचालयाच्या खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून मरण पावले तर मौद्यात भिंत पडून मुलगा वाहून गेला होता. चंद्रपुरात घराची भिंत अंगावर कोसळून एक वृद्धा ठार झाली तसेच माजरी आणि भद्रावतीत प्रत्येकी एक बळी गेला. वर्धा, गोंदिया, वाशीम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्य़ाला जबरदस्त पावसाने झोडपले. नागपूर जिल्ह्य़ातील सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक ३८२ मि.मी. पाऊस झाला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागपूर जिल्ह्य़ात बुधवारी २६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात १६४. ७ तर ग्रामीणमध्ये ४१० मि.मी. पाऊस झाला. आज सकाळी पावसाने नागपूसह काही जिल्ह्य़ांमध्ये उघडीप दिली. परंतु, येत्या ३६ तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने चिंतेचे वातावरण आहे.