News Flash

करोनामुक्तीचा हिवरेबाजार पॅटर्न; गावकरी आणि त्यांचा पुढारी यांच्या समन्वयाने गावातून करोना हद्दपार

करोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन, विलगीकरण, चाचण्या या सगळ्याच्या योग्य नियोजनाने हे गाव करोनामुक्त झालं आहे.

देश करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत असताना हिवरे बाजार हे गाव मात्र करोना मुक्त झालं आहे. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातलं हे गाव करोनामुक्त होण्याचं संपूर्ण श्रेय त्या गावचे उपसरपंच पोपटराव पवार यांना जातं. जर नेता चांगला असेल तर गाव कुठल्या कुठे जाऊ शकतं याचं हिवरे बाजार एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.

हे गाव करोनामुक्त कसं झालं याबद्दल जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी पवारांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपल्या गावचा करोनामुक्तीचा पॅटर्न सांगितला. करोनाचा प्रसार कसा रोखला हे सांगताना पवार म्हणाले, मार्च महिन्यात एका गावकऱ्याला करोनाची लक्षणं दिसू लागली, आम्ही त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तात्काळ विलगीकरणात ठेवलं. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत आम्ही रॅपिड अँटिजेन चाचणीचा निकाल विचारात घेतला.

हेही वाचा- केंद्र सरकारने लसीकरणाविषयीच्या नियमावलीमध्ये केले महत्त्वपूर्ण बदल

ते पुढे म्हणतात, मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ५२ करोनाबाधितांची नोंद झाली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार देण्यास सुरुवात केली. यासाठी आम्ही डॉक्टरांची मदत घेतली. या रुग्णांपैकी चार जणांना व्हेंटिलेटर्सची गरज असल्याने त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केलं. दुर्दैवाने त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. पण आज आमचं गाव करोनामुक्त झालं आहे.

करोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन

गावातल्या प्रत्येकाने करोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंगच नव्हे तर प्रत्येक घराचा सॅनिटायझेशनसाठी उपयोगी साहित्य ग्रामपंचायतीकडून पुरवण्यात आलं. त्याचबरोबर मास्कही परिधान केले. तसंच बाजारामध्ये सर्व नियमांचं काटेकोरपमे पालन होत आहे का याकडे लक्ष ठेवण्यासाठी चार गटही नेमण्यात आले. शेतीच्या कामासाठी बाहेरच्या गावांमधून राज्यांमधून येणाऱ्या मजुरांना, कामगारांना गावाबाहेरच राहण्याची विनंती केली. ग्रामपंचायतीचा एक गट दर आठवड्याला प्रत्येक गावकऱ्याची ऑक्सिजन पातळी आणि तापमानाची नोंद करत होता. गावातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला परत येताना सॅनिटायझेशन करणं बंधनकारक होतं. त्यांनी स्वतःला आपल्या परिवारापासून आणि गावकऱ्यांपासून विलग ठेवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झाल्याचं पवार सांगतात. गावात आत्तापर्यंत साधारण २००च्या आसपास ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे. या गावाची लोकसंख्याच १६०० आहे.

आणखी वाचा- “करोनातून बरे झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देणं धोकादायक”, IMA नं दिला इशारा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 6:38 pm

Web Title: hiware bajaar village is now covid free due to efforts of leader popatrao pawar and villagers vsk 98
Next Stories
1 “माझा दीड वर्षांचा अनुभव, मी घरातूनच राज्य चालवतोय…”
2 “….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं
3 “खतांच्या किमतीत वाढ केंद्र सरकारने केलेली नसून…..”, सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन!
Just Now!
X