सोलापूर : दिवाळी पाडव्याची सर्वत्र धामधूम असताना माळशिरस तालुक्यातील श्रीपूर महाळुंग येथे चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने स्वत:च्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडल्याने गावात पाडव्याच्या आनंदावर विरजण पडले. संशयित खुनी तरुणाच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुषमा गणेश टिंगरे (वय २६) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी शौकत मौला मुलाणी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश कांतिलाल टिंगरे (वय ३३) हा आपली पत्नी सुषमा हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेऊन तिला त्रास देत असे. कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या मनातील संशयाचे भूत काही उतरत नव्हते. सुषमा ही घराच्या दरवाजावर एकटी उभी राहिल्यास कोणाची वाट पाहतेस? कोण येणार आहे, अशा अपमानास्पद शब्दांत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गणेश हा तिला मारझोड करीत असे. ती सर्व काही सहन करीत सासरी नांदत होती. परंतु वरचेवर पती गणेश हा असहय़ त्रास देत होता. दिवाळी साजरी होत असतानादेखील तो घरात याच कारणावरून भांडण काढून पत्नीला मारहाण करीत असे. पाडव्याच्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा त्याने चारित्र्याच्या संशयावरून सुषमा हिला मारहाण केली. तेव्हा सहनशक्ती संपल्याने सुषमा हिने अखेर प्रतिवाद केला तेव्हा गणेश आणखी भडकला. त्यातूनच त्याने सुषमा हिला बेदम मारहाण केली. त्या वेळी त्याने तिचा गळा जोरात आवळला. त्यामुळे श्वास गुदमरून तिने जीव सोडला. घटनेनंतर तो पळून गेला. अकलूज पोलीस या गुन्हय़ाचा तपास करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 2:58 am