अमरावती : नजीकच्या दुर्गापूर येथील एका शेतात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या अजगराला सर्पमित्र आणि वन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले आहे.

गेल्या २३ नोव्हेंबरला दुर्गापूर येथील शेतशिवारात सर्पमित्र राम कोशे यांना अजगर आढळून आला. त्याची नोंद करण्यासाठी बडनेरा येथील वन विभागाच्या कार्यालयात नेले असता तो अजगर गंभीर जखमी असल्याचे निदर्शनास आले. वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल भटकर आणि वनरक्षक प्रशांत खाडे यांच्या चमूने जखमी अवस्थेतील अजगराला ‘वसा रेस्क्यू सेंटर’वर उपचारार्थ दाखल केले.

त्यानंतर पशू शल्यचिकित्सक डॉ. विजय हटकर यांच्यासह रोहित रेवाळकर, भूषण सायंके, मुकेश वाघमारे, अनिकेत सरोदे, प्रशांत खाडे आणि रितेश हंगरे या चमूने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर त्याची निगा राखण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा अजगराला वसा रेस्क्यू सेन्टरला दाखल केले. तब्बल २८ दिवस वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी अजगराची सुश्रूषा केली. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अजगराची तपासणी करून तो नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. वन विभाग आणि वसा संस्थेच्या प्रयत्नांना पशू चिकित्सकांच्या मदतीने यश आले. वसा संस्था दरवर्षी ७ ते १३ जखमी अजगरांना वैद्यकीय उपचार मिळवून देते. वन विभागाच्या विनंतीने जखमी अवस्थेतील पक्षी आणि प्राण्यांची सुश्रूषा करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत शहरातील वेगवेगळ्या भागातून मिळालेल्या कासवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आढळलेले दोन्ही कासव ‘इंडियन फ्लेप शेल टर्टल’ जातीचे असल्याची माहिती वसाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सदर जातीच्या कासवांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कासवांना घरी पाळीव म्हणून ठेवू नये. कायद्याची माहिती नसल्यामुळे अशा घटना घडल्यास तो गुन्हा ठरू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

‘रेस्क्यू सेंटर’ साठी शहरानजीक जागा हवी

वसा संस्था दररोज १८ ते २७ प्राण्यांना वैद्यकीय मदत पुरवते. संस्थेचे पदाधिकारी शहरात गेल्या चार वर्षांपासून विनामूल्य वैद्यकीय सेवा देत आहेत. सद्यस्थितीत वसा रेस्क्यू सेंटरमध्ये ११ श्वान, १३ मांजरी, जखमी पक्षी उपचार घेत आहेत आणि हे सेंटर उत्तमसरा या गावी आहे. मात्र जागेच्या अभावी प्रत्येक प्राण्याला सेंटरवर उपचाराकरिता दाखल करता येत नाही. त्यामुळे वसाला सुसज्ज रेस्क्यू सेंटरकरिता अमरावतीच्या ५ ते १० किलोमीटरच्या परिसरात प्रशस्त जागा हवी आहे. नागरिकांनी त्यांच्या उपयोगात नसलेली जागा रेस्क्यू सेंटरकरिता उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन वसाचे अध्यक्ष शुभम सायंके यांनी केले आहे.