जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदीसंबंधित असलेल्या विविध शंका आणि प्रश्नांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सोमवारी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी माने यांनी प्रकल्पग्रस्तांशी बोलताना प्रकल्पासंबंधित चर्चा करणे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचे आश्वासन दिले.

काही दिवसांपूर्वी जानशी येथील विश्वनाथ पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी रत्नागिरी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष माने यांची भेट घेतली होती. या भेटीच्यावेळी त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासंबंधित विविध प्रश्न आणि शंकाचे अद्यापही निरसन झाले नसल्याची तक्रार केली होती. त्यासंबंधित प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माने आज तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी कुवेशी आणि तुळसुंदे येथे प्रकल्पग्रस्तांसोबत सभा झाल्या. यावेळी बोलताना माने यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. त्यातच त्यांच्या शंकांचेही समाधान होणे गरजेचे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी यांना आणण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव, विश्वनाथ पटवर्धन आदींसह कुवेशी आणि तुळसुंदे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.