जालना विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांचे शहरी भागात प्राबल्य असल्याने भारतीय जनता पक्षास येथून मताधिक्य मिळणार नाही, असे राजकीय वर्तुळात मानले जात होते. अगदी भाजपच्या वर्तुळातही जालना विधानसभा मतदारसंघात थोडीफार कमी मते मिळाली तर त्याची भरपाई अन्यत्र होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात भाजपचे उमेदवार दानवे यांना जालना विधानसभा मतदारसंघात २९ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली आणि हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा भ्रमाचा भोपळा फुटला.
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मतांचे प्रमाण कमी झाले. पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना भाजपपेक्षा जवळपास १५ हजारांचे मताधिक्य होते. तर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथून काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांना शिवसेनेचे भास्कर अंबेकर यांच्यापेक्षा २० हजारांहून अधिक मते मिळाली होती. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुनर्रचनेनंतरही भाजप उमेदवारास मिळालेले मताधिक्य पाहता काँग्रेससाठी हा बालेकिल्ला नाही, असे स्पष्ट झाले.
वास्तविक पाहता मागील २५ वर्षांतील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिले तरी आठपैकी पाच वेळेस जालना विधानसभा क्षेत्रात काँग्रेसपेक्षा भाजपचे मताधिक्य आहे. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत जालना विधानसभा क्षेत्रात काँग्रेसपेक्षा भाजपची मते १५ हजारांपेक्षा अधिक होती. १९९१ मध्ये काँग्रेसला फक्त १ हजार ८८४ चे मताधिक्य होते. १९६६च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराची मते जालना विधानसभा क्षेत्रात काँग्रेसपेक्षा जवळपास १५ हजारांनी अधिक होती. १९९८ मध्ये मात्र काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर भाजप उमेदवाराच्या तुलनेत जवळपास २१ हजार मतांनी आघाडीवर होते. परंतु १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसचे बांगर यांच्यापेक्षा भाजपचे उमेदवार दानवे यांना जालना विधानसभा क्षेत्रात ३ हजार ९०० पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला भाजपपेक्षा जवळपास साडेआठ हजार मते कमी पडली होती. २००९ मध्ये काँग्रेसला तर २०१४ मध्ये भाजपला विधानसभा क्षेत्रात मताधिक्य आहे.
१९९० पासून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जालना मतदारसंघ कायम काँग्रेसच्या बाजूने राहिलेला नाही. १९९० मध्ये शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकचंद बोथरा यांच्यापेक्षा २६ हजार ६६० एवढे मताधिक्य होते. १९९५ मध्ये तर खोतकर यांना काँग्रेसच्या तुलनेत जवळपास ४४ हजार मते अधिक पडली होती. १९९९ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार गोरंटय़ाल यांना ६५ हजार १ मते होती, तर विरोधी उमेदवार अर्जुन खोतकर यांना मिळालेली मते ६१ हजार ११७ होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत येथून खोतकर हे काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळवून  विजयी झाले होते. तात्पर्य विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात १९९० पासूनच्या पाचपैकी तीन निवडणुकांत काँग्रेस शिवसेनेपेक्षा पिछाडीवर राहिली, तर दोन निवडणुकांत आघाडीवर राहिली. गेल्या २५ वर्षांतील लोकसभेच्या आठपैकी पाच निवडणुकांत जालना विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या तुलनेत भाजपला मताधिक्य आहे. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरही जालना विधानसभा क्षेत्राने २०१४ मध्ये भाजपमध्ये मताधिक्य दिलेले आहे.