“जलयुक्त शिवारमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं नियोजन करणं शक्य झालं. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी आणि गावांनी सहभाग घेतला. त्यामुळे अनेक गावांमधील पाणी टंचाई दूर झाली. जलयुक्त शिवार आमच्या काळचा उत्तम निर्णय आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘ लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

“जलयुक्त शिवारचा अनेकांना फायदा झाला असला तरी नंतरच्या काळात काही लोकांनी त्याचं राजकारणं केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं यावरील चौकशीसाठी समितीही स्थापन केली होती. यादरम्यान या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यात आली. या समितीनं संपूर्ण आढावा घेतल्यानंतर एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालातही या योजनेचा सर्वांना फायदा झाल्याचं सांगितलं होतं. मराठवाड्यालाही या योजनेचा फायदा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. जर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असती तर किती भयावह परिस्थितीत निर्माण झाली असती याबद्दलही त्या अहवालात सांगण्यात आलं होतं” असं फडणवीस म्हणाले.

ग्रामसडक योजनाही महत्त्वाची

आमच्या कालावधीत पायाभूत सुविधांची अनेक काम आम्ही घेतली. त्यातली अनेक कामं पूर्णही झाले. रस्ते, शहरी वाहतूक, ग्रामसडक योजना अशी अनेक कामं आम्ही केली. ग्रामसडक योजनेची ९९.९५ कामं ही उत्तम दर्जाची झाल्याचं जागतिक बँकेनंही सांगितलं. ०.५ टक्के कामांमध्ये काही त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या. ही सर्वात महत्त्वाची योजना होती असंही ते म्हणाले.