कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या १७ ऑक्टोबरपासून परीक्षा होत असून एकूण ५० हजार ४१७ विद्यार्थी ऑनलाईन तर २३ हजार ५९४ विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिली.

एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ५९९ तर विद्यार्थींनींची ३९ हजार ४१५ आहे, असे सांगून सामंत म्हणाले, परीक्षार्थींमध्ये ११२ दिव्यांग विद्यार्थी आणि ९० दिव्यांग विद्यार्थीनी आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २९३ महाविद्यालयांमध्ये परीक्षा होणार आहेत. सराव प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत. मौखिक चाचणीही होणार आहे. मुंबईतील ऑनलाईन परीक्षेच्या अडचणी लक्षात घेवून या परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

सीमाभागात भव्य शैक्षणिक संकुल

सीमा भागात महाविद्यालया बाबत ते म्हणाले, दोन जागा निश्चित करण्यात आल्या. डॉल्फिन नावाच्या कंपनीची जागा तात्पुरती घेवून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सामंजस्य करार करण्याच्या सूचना केली आहे. १० एकर जागा शोधण्यात आली असून ती लवकर शासनाकडून मिळवली जाईल. चांगल्या पध्दतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. सीमा भागातील समित्यांसोबत चर्चा करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने सीमा भागात हे शैक्षणिक संकुल भव्यदिव्य असेल. त्यासाठी देणगी स्वरूपात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

ग्रंथालये सुरू करणार

ग्रंथालये सुरू करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नियमावली तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. लवकरच ही ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले