प्रबोधनात्मक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी नाही

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमध्ये किशोरवयीन मुली ते महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे  तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य अशा आरोग्यविषयक बाबी व्यवस्थित न पाळल्या गेल्याने महिलांमध्ये त्वचाविकार व गर्भधारणाविषयीचे आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल उघडपणे,  बोलण्यासाठी महिलांना अवघड जात असल्यामुळे माहिती मिळणे  कठीण होत आहे.

र्निजतुकीकरण केलेले सॅनेटरी नॅपकिन पॅड  वापराची योग्य ती माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागात आजही  असुरक्षित असलेले कापड वापरले जात आहे. हे कापड वापरल्यामुळे महिलांना पाळी व्यवस्थापनाच्या वेळी आरोग्याशी निगडित गुंतागुंत निर्माण होत आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढे त्यांच्या आरोग्यावर याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या विविध विभागांमार्फत प्रशिक्षणे, जनजागृती, सॅनेटरी नॅपकिन पॅडचा वापर, या काळात आरोग्याची काळजी घेणे  आदी विषयांवर विविध कार्यक्रम  राबविण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे उमेद अभियान अशा विविध विभागांच्या मार्फत  विविध उपाययोजना व जनजागृती करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात  प्रभावी अंमलबजावणी  नाही. याउलट हे विभाग त्यांना दिलेले काम व उद्दिष्ट पूर्ण केले असे दाखवून हे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे दाखवत आहेत.

एकत्रीकरणातून जनजागृती आवश्यक

विविध विभागांमार्फत वेगवेगळ्या योजना यासाठी राबविल्या जात असल्या तरी या सर्व विभागांचे जिल्हास्तरावर एकत्रीकरण करून व्यवस्थापनाचे नियोजन करता येणे शक्य आहे. विशेषत: त्याची जनजागृती होत असली तरी पॅडचा सुरक्षित वापर याचे महत्त्व ते वापरण्याचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी मोहीम राबविणे आवश्यक आहे. यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उद्भवणारे दुष्परिणाम

व्यवस्थापन योग्य प्रकारे नसेल तर  अनेक विकार उद्भवतात. यामध्ये विशेषत: त्वचाविकार, केसांच्या मुळात गुठळ्या तयार होणे, शरीरातून पांढरे द्रव पाझरणे, गर्भाशय, मूत्रमार्ग संसर्ग,  मानसिक संतुलन बिघडणे, गर्भधारणेत गुंतागुंत, गर्भधारणा न झाल्यास मूल होत नाही म्हणून सामाजिक ताण, कौटुंबिक कलह  अशा अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते.

उपाययोजना

ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने त्याबाबत जनजागृती करून त्याचे नियोजन याबाबत सातत्य राखणे, र्निजतुक केलेले कोरडे सुरक्षित सुतळी कापड व सॅनिटरी पॅडचा प्रभावी वापर,  सुरक्षा,स्वछता व निगा राखणे,  साबण व स्वच्छ पाणी वापरणे, अंतर्वस्त्र वारंवार बदलणे, काही गुंतागुंत निर्माण झाल्यास नि:संकोच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते.

मासिक पाळी व्यवस्थापन हे महिलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठीची नैसर्गिक क्रिया आहे. त्यासाठी महिलांनी त्याचे महत्त्व लक्षात घेत त्याबाबतची सुरक्षा व स्वच्छता राखणे व काही त्रास असल्यास नि:संकोच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

– सचिन नवले, वैद्यकीय अधिकारी, जे.जे.माताबाल संगोपन केंद्र