येथील जयप्रभा स्टुडिओबाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दाखल केलेला दावा गुरुवारी सत्र न्यायालयाचे न्या.एस.एस.गोसावी यांनी फेटाळून लावला. स्टुडिओच्या मालक लता मंगेशकर या आपल्या मर्जीनुसार स्टुडिओची विल्हेवाट लावू शकतात असा निर्वाळा या निकालामुळे मिळाला आहे. तर या निकालाविरुध्द उच्च न्यायालयामध्ये अपील करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.
मराठी चित्रपट सृष्टीतील ऐतिहासिक ठेवा म्हणून जयप्रभा स्टुडिओकडे पाहिले जाते. साडेदहा एकर जागेमध्ये हा स्टुडिओ होता. त्यातील सात एकर जागा यापूर्वीच विकली आहे. उर्वरित साडेतीन एकर जागेची विक्री करण्याचा निर्णय स्टुडिओच्या मालक लता मंगेशकर यांनी घेतला होता. त्यासाठी कोल्हापुरातील एका व्यापाऱ्याशी करार पण करण्यात आला होता. मंगेशकर यांच्या या निर्णयाविरुध्द कोल्हापुरातील नागरिकांनी तसेच चित्रपट महामंडळाने आवाज उठविला होता.
स्टुडिओच्या जागेची विक्री न करता तो हेरिटेज स्वरूपात जतन केला जावा, अशी मागणी करून गतवर्षी यावरून आंदोलनही करण्यात आले होते. यावर न थांबता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने येथील न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली होती.
न्या.सानिया जोशी यांच्यासमोर ३ सप्टेंबर २०१२ रोजी कामकाज चालले असता त्यांनी जैसे थे चा निर्णय दिला होता. त्यानंतर सुनावणी झाली. १७ ऑक्टोबर रोजी लता मंगेशकर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. याविरोधात चित्रपट महामंडळाने सत्र न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयात ही सुनावणी होऊन गुरूवारी न्या.गोसावी यांनी महामंडळाची याचिका फेटाळून लावली.
निकालानंतर मंगेशकर यांचे वकील अॅड.महादेवराव आडगुळे म्हणाले, जयप्रभा स्टुडिओ हा लता मंगेशकर यांची खासगी मालमत्ता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.