पक्षाचे निवडून आलेले ४१ व ४ आमदार सोबत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. विधानसभेतील काँग्रेसचे ५ आमदार सध्या निलंबित असून, या पाश्र्वभूमीवर चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीस विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पवार बोलत होते. पवार म्हणाले, की राष्ट्रवादीकडेच सध्या ४५ आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे ३ अपक्ष आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. अपक्ष आमदार रवि राणा राष्ट्रवादीपुरस्कृत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा हक्क आहे, तसा दावा आम्ही करणार आहोत.
राज्यावरील कर्जामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या प्रयत्नात अडथळा येत अल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या तक्रारीकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, की राज्यात आघाडीचे सरकार होते तेव्हा दुष्काळी उपाययोजना करताना राज्यावरील कर्जाचे कारण पुढे केले नव्हते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारला असे कारण देता येणार नाही. गरज पडली तर कर्ज काढून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना व जनतेला मदत करण्याची भूमिका भाजप सरकारने घेतली पाहिजे.
विधानसभेत विरोधी बाकांवरून आम्ही सरकारला राज्यात पावसाअभावी निर्माण झालेली स्थिती व त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे, तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सांगणार आहोत. राज्यातील सध्याच्या विदारक स्थितीची जाणीव सरकारला करून द्यावी लागणार आहे. सरकारने दुष्काळाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल. सर्वसामान्य शेतकरी व जनतेशी आमची बांधिलकी आहे. विहिरी कोरडय़ा पडत असून जेथे थोडेसे पाणी आहे, तेही पिकांना देण्यात महावितरणच्या नादुरुस्त रोहित्रांचा अडथळा येत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. ही स्थिती बदलली पाहिजे. पिकांचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्जफेड करण्यासाठी शेतकरी असमर्थ ठरत आहे, असेही ते म्हणाले.
पवार यांनी जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यांतील पीकपरिस्थितीची पाहणी केली. डांबरी येथे त्यांनी कापूस व मोसंबी फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेवगा व रुई गावांच्या परिसरातील शेतीचीही त्यांनी पाहणी केली. आत्महत्या केलेल्या भार्डी येथील शेतकरी प्रकाश अप्पासाहेब लहाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे व आमदार राजेश टोपे यांनी या दौऱ्यात पवार यांना जिल्हय़ात कमी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. या वेळी आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे उपस्थित होते.