गॅस बंद करण्यास विसरल्यामुळे झालेल्या स्फोटामध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथील एका पाच वर्षांच्या चिमुरड्यानं प्राण गमावले असून चार जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री स्टोव्हचा गॅस बंद करण्याचे राहून गेले होते, आणि रात्रभर गॅस लीक होत होता. शुभांगी कट्टे (लय 32) ही महिला सकाळी चहा करण्यासाठी स्टोव्ह पेटवायला गेली आणि स्फोट झाला. यामध्ये तिच्यासह तिचा पती बबन (वय 40), शेजारी नाना जाधव (वय 36) व अश्विनी जाधव (वय 32) जखमी झाले. तर शुभांगी व बबन यांचा मुलगा सोहम मात्र दगावला आहे.

जाधव आणि कट्टे हे शेजारी शेजारी भाड्याच्या खोलीत राहत होते. या स्फोटामुळे घराची भिंत पडली आणि शेजारीही जखमी झाले. भिंत अंगावर पडल्यामुळे सोहमचा मृत्यू झाला. त्याच्या दोन बहिणी आजीकडे रहायला गेल्या होत्या, ज्यामुळे त्या बचावल्या. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अश्विनी या चांगल्याच भाजल्या असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची परिस्थिती नाजूक आहे. अश्विनी 60 टक्के भाजल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे अग्निशमन दलाला पोलिसांनी याबाबत काही कळवलंच नाही. सोशल मीडियावरून ही बातमी समजल्यावर अग्निशमन दलाचे जवान चार तासांनी घटनास्थळी दाखल झाले. गॅसची गळती होत होती आणि कुणालाच वास आला नाही हे आश्चर्यजनक असल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे अधिकारी नानाभाऊ राठोड यांनी व्यक्त केली. कट्टे कुटुंब साताऱ्याचं असून सोहमचे पार्थिव अंत्यविधीसाठी मूळ गावी नेण्यात आले आहे.