महाविद्यालयीन युवक-युवतींनी अतिशय जोमदारपणे भाग घेतलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पध्रेसाठी रत्नागिरी केंद्रावर शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीत चार एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.  सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या स्पध्रेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी शनिवारी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला अस्तित्व संस्थेचे सहकार्य असून झी मराठी माध्यम प्रायोजक आहे. स्पध्रेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीहून एकूण दहा महाविद्यालयांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची (रत्नागिरी) ‘हिय्या’, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची (महाड) ‘राजा’, डीबीजे महाविद्यालयाची (चिपळूण) ‘कबूल है’ आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची (सांगली) ‘एका रात्रीच्या गर्भातील गोष्ट’ या चार एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात येत्या बुधवारी (१० डिसेंबर) ही फेरी होणार असून त्यातून प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला राज्यस्तरीय स्पध्रेच्या अंतिम फेरीत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
रत्नागिरी विभागीय अंतिम फेरीसाठी शनिवारी निवडण्यात आलेल्या चारही एकांकिकांचे विषय अतिशय वेगवेगळे होते. त्यापैकी ‘राजा’ आणि ‘एका रात्रीच्या गर्भातील गोष्ट’ या दोन एकांकिकांमध्ये प्रत्येकी दोनच पात्रे होती. पण प्रभावी संवाद व सादरीकरणाद्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. उरलेल्या दोन एकांकिका मात्र समूह नाटय़ाच्या अंगाने जाणाऱ्या होत्या. अनिल दांडेकर आणि लक्ष्मीकांत भाटकर यांनी या फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘लोकसत्ता’ने या स्पध्रेद्वारे युवा कलाकारांना फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा त्यांनी डोळसपणे उपयोग करून घ्यायला हवा, असे मत स्पध्रेचे परीक्षक दांडेकर यांनी नोंदवले.
युवा कलाकारांसाठी  वेगळे व्यासपीठ
स्पध्रेत सहभागी झालेल्या सर्वच महाविद्यालयीन कलाकारांनी अन्य महाविद्यालयीन एकांकिकांच्या तुलनेत या स्पध्रेच्या वेगळेपणाबद्दल दाद दिली. ‘इतर स्पर्धामधून आम्हाला फारसे पुढे जाण्याची संधी मिळत नाही. पण या स्पध्रेत झी मराठी माध्यम प्रायोजक असल्याने आणि आयरिस प्रॉडक्शन्सचे प्रतिनिधी स्पध्रेच्या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या गुणवत्तेची नोंद घेत असल्यामुळे या क्षेत्रात आणखी पुढे जाण्याची संधी या स्पध्रेमुळे मिळेल,’ असा विश्वास गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मनोज भिसेने व्यक्त केला, तर ‘महाविद्यालयीन एकांकिकांच्या दृष्टीने उपलब्ध झालेल्या या वेगळ्या व्यासपीठामुळे युवा नाटय़ चळवळीला गती मिळेल,’ असा आशावाद डीबीजे महाविद्यालयाच्या ओंकार भोजने या युवा कलाकाराने नोंदवला.  दोन एकांकिका सादर होण्याच्या मध्यंतराच्या काळात आयरिस प्रॉडक्शन्सचे प्रतिनिधी विशाल मोढवे, वैभव शेतकर यांनी युवा कलाकारांशी संवाद साधताना, नाटय़ क्षेत्रात अभिनय वगळता इतरही अनेक अंगे आहेत. त्यामध्ये कौशल्य आत्मसात करून या क्षेत्रातील करिअर घडविण्याचा सल्ला दिला.