News Flash

“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या,” मुनगंटीवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर

वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून पहिल्या दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. विधानसभेत वादळी चर्चेनंतर विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची घोषणा का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनीही उत्तर दिलं.

मुनगंटीवार काय म्हणाले –
“वैधानिक विकास महामंडळाची घोषणा का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्रातील लोकं राहतात हे लक्षात‌ ठेवावे. विदर्भ, मराठवड्याची जनताही महाराष्ट्राचा भाग आहे. जनतेच्या वतीने डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये यासाठी हात जोडून विनंती करतो. या सभागृहात मला करोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं. अजित पवार यांनी आश्वासन देऊन ७२ दिवस झाले आहेत. आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही एवढंच सांगावं,” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. “हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे, नातवाने पेटून उठलं पाहिजे. १० दिवसांचं अधिवेशन एकदम १० नंबरी झालं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

अजित पवारांचं उत्तर –
“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं.

देवेंद्र फडणवीस संतापले
“मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भाला ओलीस ठेवलं आहे. किती राजकारण करत आहात ? विदर्भ, मराठवड्याचं कवच ही जर वैधानिक विकास मंडळं नसती तर कसं लुटून नेलं असतं हे वारंवार सभागृहात मांडलं आहे. या सभागृहात तर अजित पवारांना वैधानिक विकास मंडळं आमच्या हाताशी होती म्हणून तुम्हाला बजेट मागे घ्यावं लागलं होतं. परत जाऊन त्यात विदर्भ, मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. तो तुमचा आणि राज्यपालांचा विषय आहे. महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? राज्यपाल कोणत्याही पक्षाचे नाही. त्यामुळे अजित पवारांना माझी हात जोडून विनंती आहे की, असं म्हणू नका अन्यथा विदर्भ, मराठवाड्यातील जनता माफ करणार नाही. तुम्ही दिलं नाही तर संघर्ष करुन मिळवू…ही भीक नाहीये. आम्ही भिकारी नाही आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वैधानिक विकास मंडळं करा अथवा नको पण संविधानाने जे दिलं आहे ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करतो,” असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:51 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar bjp sudhir mungantiwar budget session sgy 87
Next Stories
1 “ए काय रे…,” अन् सभागृहातच फडणवीस संतापले
2 माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत ठाम भूमिका मांडत आहे – राज्यपाल
3 विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने; एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
Just Now!
X