राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला होता. पण, १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास शिवसेनेला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणीही राज्यपालांनी फेटाळली आणि तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. यामुळे शिवसेनेची मात्र मोठी ‘गोची’ झाली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींवर शिवसेनेवर निशाणा साधण्याची संधी भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सोडली नाही. त्यांनी मिश्कील टिप्पणी करत शिवसेनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हीच ती वेळ’, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला ट्विटरद्वारे खोचक टोला लगावला आहे. ट्विटमध्ये त्यांनी स्माईली इमोजीचाही वापर केलाय. यात त्यांनी शिवसेनेचा थेट उल्लेख केलेला नाही पण अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. शिवसेनेकडून सातत्याने आमचाच मुख्यमंत्री बनेल असा दावा केला जात होता. तसंच, निवडणुकीदरम्यान ‘हीच ती वेळ’ असं म्हणत शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू होता. त्यावरुनच नितेश राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.

दरम्यान, ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याचं पत्र न दिल्यामुळे शिवसेनेची मात्र फजिती झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेनंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि आघाडीत सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते. निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे होत आले आहेत, तरीही सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.