पोलिसांच्या दडपशाहीनंतरही सुकाणू समितीचे मौन

एकीकडे शेतकरी संपादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असतानाच त्यानंतर शेतकरी आंदोलकांना चक्क देशद्रोही ठरवणारे मुख्यमंत्र्यांचे विधानही प्रसिद्ध झाले. परभणीत पोलिसांनी शेतकरी नेत्यावर थेट दरोडय़ाचे गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते कॉ. विलास बाबर यांना दरोडय़ासारख्या गुन्ह्य़ात अटक झाल्यानंतरही शेतकरी सुकाणू समितीने मौन धारण केले असून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदविण्याचे भानही शेतकरी सुकाणू समितीला राहिले नाही. अशावेळी ही समिती केवळ बुजगावणे म्हणूनच उरली असल्याची भावना संतप्त कार्यकत्रे बोलून दाखवत आहेत.

शेतकरी संपादरम्यान जेव्हा वातावरण पेटलेले होते तेव्हा जिल्ह्य़ात सर्वपक्षीय सुकाणू समिती गठित झाली. याच सुकाणू समितीतील एखाद्या प्रमुख नेत्यावर पोलीस दरोडय़ासारखे गुन्हे दाखल करतात आणि सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देतात तेव्हा पोलिसांच्या या कृत्याचा साधा निषेधही शेतकरी सुकाणू समितीकडून होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम संघर्षशील भूमिका घेणाऱ्या कॉ. विलास बाबर यांना पोलिसांनी ब्राह्मणगाव येथील शेतकरी संपादरम्यान घडलेल्या एका घटनेत आरोपी म्हणून अटक केले आहे. ४ जूनला ब्राह्मणगाव पाटीवर राजहंस कंपनीच्या दुधाचा टेंपो परभणीकडे येत होता. हे वाहन त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातच अडवले आणि वाहनातील दुधाची पाकिटे इतस्तत फेकून दिली. घटना घडली तेव्हा संपूर्ण राज्यातच शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला होता आणि राज्यभरात विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उद्रेक बाहेर पडत होता. या घटनेची फिर्याद संबंधित वाहनचालक सतीश झोडपे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच दिवशी दिली होती. त्यावेळी फिर्यादीत आरोपी हे अज्ञात होते. ही घटना घडून अडीच महिने लोटल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे.

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक केली होती. यावेळीही पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अमानुष असा लाठीमार केला. दुसऱ्या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्यात कॉ. बाबर यांचाही समावेश होता. त्यानंतर पुन्हा पोखर्णी येथील रास्ता रोकोच्या गुन्ह्य़ात त्यांना अटक दाखवली गेली. आंदोलकांवर हे सत्र सुरूच असताना चक्क दोन महिन्यापूर्वी नोंदवल्या गेलेल्या ब्राह्मणगाव पाटीवरील प्रकरणात कॉ.बाबर यांना पुन्हा पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांना दरोडय़ासारख्या गुन्ह्य़ातील आरोपी दाखवून सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. कॉ. बाबर हे प्रत्यक्ष ब्राह्मणगाव येथील घटनास्थळी हजर होते काय? दोन महिन्यानंतर सूडबुद्धीने त्यांना अटक करण्याचे नेमके कारण काय? गेल्या दोन महिन्यापासून ते सतत आंदोलनात सक्रिय असल्याने आणि स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या आंदोलनातही त्यांचाच पुढाकार असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली असण्याची शक्यता आहे.

कार्यकर्ते, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

शेतकरी सुकाणू समितीने या प्रकाराबद्दल जराही आवाज उठवला नाही. १८ ऑगस्टला काही कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. तरीही सुकाणू समितीने मात्र या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करणे तर दूरच, पण या संपूर्ण प्रकरणाला चव्हाटय़ावर आणून शेतकरी लढय़ाची धार तीव्र करणे सहजशक्य होते. मात्र असे काहीही न करता जिल्ह्य़ात शेतकरी सुकाणू समितीच्या नेत्यांनी कातडीबचाऊ भूमिका घेत पोलिसांच्या दडपशाहीला मोकळे रान प्राप्त करून दिले आहे. याच पद्धतीने जर आणखी काही शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टिपून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करायचे पोलिसांनी ठरवले तर सुकाणू समितीचे कागदी नेते काय भूमिका घेणार आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असून या सर्व प्रकाराबद्दल शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे.