राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अनेक शहारांमध्ये संचारबंदी तर काही ठिकाणी लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान मागील २४ तासांमध्ये राज्यात ६ हजार ९७१ करोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी , मास्क वापरा लॉकडाउन टाळा, शिस्त पाळा लॉकडाउन टाळा, असं आवाहन केलं.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण करोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी करोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात करोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,५७,२०,२५९ (१३.३६ टक्के) नमुन्यांपैकी २१ लाख ८८४ नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५६३ जण गृहविलगीकरणात तर १ हजार ७३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

“राज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी”

“आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढतोय. त्यामुळे आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून राज्यात सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवासांसाठी बंदी असेल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Coronavirus – …तर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा!

तसेच, “करोना विरोधातील या युद्धात आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. कारण आपण जर एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा लॉकडाउन कडक पद्धतीने करावा लागेल. ही सूचना मी नाही तर करोना आपल्याला देतो आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(रविवार) नागरिकांना सूचक इशारा दिला.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात २९८ नवे करोनाबाधित – 

पिंपरी-चिंचवड शहरात आज(रविवार) दिवसभरात २९८ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ५८ जण करोनामुक्त झाले. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ३ हजार १९८ वर पोहचली असून यापैकी ९८ हजार २५७ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९५२ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.