वाई:महाबळेश्वरमध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महाबळेश्वरचा वेण्णा (लेक) तलाव तुडुंब भरुन सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. महाबळेश्वर तालुक्यात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे महाबळेश्वरचा वेण्णा तलाव (लेक) भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे महाबळेश्वर पाचगणीच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

महाबळेश्वरमध्ये जून महिन्याच्या प्रारंभी आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रदुर्भावाने परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. त्यानंतर जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरु राहीला. जूनच्या अखेरीस मात्र शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची धुवाँधार सुरू झाली. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर – पाचगणीकरांची तहान भागविणारे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण वेण्णा तलाव तुडुंब भरला. याशिवाय बुधवारी सायंकाळी वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून वेण्णालेकसह परिसरात सर्वत्र दाट धुके पाहावयास मिळत आहे.काल दिवसभरात १७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेण्णालेक परिसरात रेनकोट, छत्री घालून सेल्फी घेताना स्थानिक हौशी नागरिक पाहावयास मिळत असून मुसळधार पाऊस, दाट धुके आणि वाऱ्याचा ते आनंद घेत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागेल असून महाबळेश्वरचे अवघे रुपडे पालटले आहेत. तर १ जून ते ९ जुलैपर्यंत १३४९. ३ मिमी (५३.१२२ इंच) पावसाची नोंद झाली आहे.