देशकार्य साधताना आगामी काळात विरोधकांशी सामंजस्य राखणे महत्त्वपूर्ण बनणार आहे. या स्थितीत मी काही भूमिका घेणार आहे, त्यासाठी पुढाकार घेतला म्हणून माध्यमांनी त्याचा विपर्यास करू नये. त्यांनी नेहमी वस्तुनिष्ठ भूमिका बजावावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
‘कोल्हापूर प्रेस क्लब’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘सध्याची राजकीय परिस्थिती आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर पवार बोलत होते. देशात घडत असलेल्या धार्मिक, दहशतवादी, राजकीय आणि आíथक वातावरणाचा आढावा पवार यांनी त्यांच्या भाषणात घेतला. दहशतवादी कृत्याला संपूर्ण पाकिस्तानला दोषी धरणे चुकीचे आहे. सीमेवरच्या देशात सामंजस्य ठेवणे सद्य:स्थितीत गरजेचे असून त्यासाठी आताचे सरकार योग्य भूमिका बजावत असल्याचे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारची पाठराखण केली. त्याच वेळी विरोधाला विरोध म्हणून काम करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी टीका केली. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर सर्वानी हातात हात घालून काम करण्याचा कानमंत्रही पवार यांनी या वेळी दिला.
‘आयसिस’सारख्या दहशतवादी संघटनांकडून होत असलेली कृत्ये ही अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या हल्ल्याचे पडसाद असल्याचे आणि पठाणकोट हल्ल्याबाबत ते म्हणाले, की या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची गरज असल्याचे सांगतानाच यावरून संपूर्ण पाकिस्तानला दोषी धरणे योग्य नाही. पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना भारत आणि पाकिस्तानमध्ये सौहार्दाचे संबंध राहावेत असे वाटत आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना वाढदिवसाला पाकिस्तानमध्ये जाऊन दिलेल्या शुभेच्छा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी आमची सहनशीलता संपली आहे असे विधान करणे या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली. राजकीय स्थितीवर भाष्य करताना मोदी सरकार हे मजबूत सरकार असल्याचा दाखला पवार यांनी दिला, मात्र सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात हे सरकार कमी पडत असल्याचा आरोप दुसऱ्या बाजूला केला. भाजपच्या गुजरातसारख्या सत्ताकेंद्राच्या ठिकाणी काँग्रेसला बळकटी मिळत आहे हे काँग्रेसचे यश नाहीतर सत्तेबद्दलची नागरिकात असलेली नाराजी स्पष्ट होत असून, सरकारने वेळीच सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष विकास कांबळे यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष सतीश घाटगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्रीमंत शाहूमहाराज, महापौर अश्विनी रामाने उपस्थित होते.