जगभरातील लाखो लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली तरी भारतात मात्र अवयव दानाबाबत फारशी जनजागृती नसल्याने गरजू रुग्णांना मृत्यूच्या छायेतच जीवन कंठावे लागत असल्याची वस्तुस्थिती अलीकडच्या पाहणीतून उघड झाली आहे. ‘ऑर्गन रिट्रायव्हल बँकिंग ऑर्गनायझेशन’ या संस्थेने अवयव प्रत्यारोपणाचे तंत्र आणि प्रक्रिया भारतात वास्तवात उतरविली असून रुग्णांची प्रतीक्षा यादी, दात्यांच्या नोंदी, दाता आणि गरजू रुग्ण यांचा यथायोग्य मेळ आणि त्यांच्यातील समन्वय तसेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित रुग्णालयांना ही माहितीचे पुरविली जात असली तरी अवयव दान चळवळीविषयी भारतात सामाजिक जागृती करणे अतिशय कठीण असल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सामाजिक जागृतीचा अभाव आणि मेंदूमृत कल्पनेचा अस्वीकार ही पारंपरिक कारणे यामागे आहेत. देशात सुमारे १ लाख नेत्रपटले, दीड लाख मूत्रपिंडे आणि २० हजार यकृते एवढय़ा अवयव प्रत्यारोपणाची गरज असली तरी संबंधित अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण अतिशय कमी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २५ हजार नेत्रपटल प्रत्यारोपण, ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण एवढय़ाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मानवी अवयवांची आवश्यकता आणि उपलब्धता यातील तफावत प्रचंड मोठी असून ही तफावत दूर करण्यासाठी सामाजिक जागृतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, अशी माहिती विको लॅबचे संचालक संजीव पेंढरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मृत्यूनंतर मानवी शरीरातील उपयुक्त आणि सक्षम अवयव दान करण्याचे आवाहन सामाजिक संस्थातर्फे वारंवार केले जाते. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गरजू रुग्णाला अवयव बदल करून आणखी काही वर्षे आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. परंतु, मरणोत्तर अवयव दानाचे प्रमाण भारतात नगण्य असल्याने हजारो रुग्णांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. जीवितकालीन अवयव दान आणि मरणोत्तर अवयव दान असे अवयव दान प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. भारतात मानवी अवयव दान कायदा (१९९४) नुसार जीवितकालीन अवयव दान पीडित रुग्णाचे नजीकचे व रक्ताच्या नात्यातील आप्तजन जसे भाऊ, बहीण, पालक आणि मूले करू शकतात. यात एखादी जवळची व्यक्ती त्याची एक किडनी गरजूला दान करू शकते (जर एकाच किडनीवर त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थित चालणार असेल तर) किंवा स्वादुपिंडाचा किंवा यकृताचा काही भागदेखील दान केला जाऊ शकतो. यात उरलेल्या भागातून शरीराचे नियंत्रण व्यवस्थित होऊ शकते किंवा कापलेल्या अवयवाची शरीर पुन्हा निर्मिती करू शकते. अशी क्रिया प्रत्येक इंद्रियदानी व्यक्तीच्या शरीरात घडेलच याची शाश्वती नाही, या वैद्यकीय वस्तुस्थितीकडे पेंढरकर यांनी लक्ष वेधले आहे.
श्वसन, हृदयक्रिया, स्पर्शज्ञान आणि मेंदूच्या नियंत्रणातील सर्व प्रक्रिया संपुष्टात येणे आणि शरीरघटकांना मेंदूतर्फे दिल्या जाणाऱ्या आज्ञा थांबून मेंदू मृत होणे यामुळे मनुष्य मेंदूमृत होतो. अशा व्यक्तीला व्हेंटिलेटरवर लावून त्याच्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा सुरू ठेवून शरीराचे अवयव सक्षम ठेवले जाऊ शकतात. विज्ञान आता अत्यंत प्रगत झाल्याने ही प्रक्रिया जगभरात अवलंबिली जात आहे. मेंदूमृत व्यक्तीच्या शरीरातील सक्षम अवयव कापून वेगळे केल्यानंतर एखाद्या गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारा बसवून त्याला जीवदान मिळू शकते. जगभरातील मल्टिस्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्समध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. सहा ते बारा तासांच्या अंतराने मेंदूमृत व्यक्तीच्या शरीराच्या दोन चाचण्या घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या चाचणीचा क्षण कायदेशीर मृत्यू म्हणून नोंदविला जातो. परंतु, मेंदूमृत ही संकल्पना भारतात अद्यापही मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे अवयव दान चळवळीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले आहे.
इंद्रियदाता वयाने १८ वर्षांच्या वर असेल तर त्याचे अवयव दान केले जाऊ शकतात. परंतु, त्याचे वय त्यापेक्षा कमी असेल तर पालकांची संमती अनिवार्य आहे. इंद्रियदानाची वैद्यकदृष्टय़ा पात्रता आणि अनुकूलता मृत्यूच्या वेळीच निश्चित ठरविली जाऊ शकते. अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया १९९४च्या कायद्यानुसार मान्यताप्राप्त आहे. मात्र, अवयवांची विक्री आणि फसवणूक करणाऱ्या कायद्याने शिक्षा ठोठावली जाऊ शकते. रुग्णाची गरज आणि तातडी या दोनच गोष्टी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी विचारात घेतल्या जातात. एखादा ३० वर्षांचा तरुण इंद्रियदानास अपात्र ठरू शकतो, तर साठीतील वृद्ध पात्र असू शकतो, याचाही पेंढरकर यांनी उल्लेख केला आहे.