विरार: नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रत्यत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.
नालासोपारा संतोष भुवन परिसरातील एकतानगरमध्ये आयशा नदाक (२५) ही महिला पती मुकीन नदाक (३०) आणि दोन मुलांसह राहत होती. ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. तर टाळेबंदीच्या दरम्यान पतीची नोकरी गेल्याने तो बेरोजगार होता. यामुळे तो सतत आयशाकडे पैशांची मागणी करत होता. तर त्याने काम करावे याचा तगादा तिने लावला होता. आयशाने पतीला पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती.
गुरुवारी दुपारी आयशा घरात एकटी असताना मुकीन आपल्या दोन भावंडांना घेऊन आला आणि आयशाबरोबर भांडण करून लागला. वाद इतका वाढला की, मुकीन याने पेट्रोल आणून तिच्या अंगावर टाकले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आयशाने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी येऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. आणि तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ती ५० टक्के भाजली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 12:01 am