बीडमध्ये भाऊबीजेच्या दिवशीच वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्या तरुणाने काही लोकांचा त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संत नामदेव नगरात राहणारा योगेश शिंदे हा एका कंत्राटदाराकडे चालक म्हणून काम करत होता. योगेश पत्नी शीतल (वय २८) आणि मुलगी श्रावणीसह (वय ५) तिथे राहत होता. गुरुवारी मध्यरात्री किंवा शुक्रवारी पहाटे त्याने पत्नी व मुलीला विष पाजले. यानंतर घरातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार स्थानिकांना समजताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

योगेश शिंदे हा खासगी वाहन चालक होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता अशी माहितीही समोर आली आहे. शिंदे कुटुंब पाच दिवसांपासून सासुरवाडीत राहत होते. गुरुवार रात्री तिघेही स्वगृही परतले होते. भाऊबीजेच्या दिवशीच योगेशने हे टोकाचे पाऊल उचलले असून कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानेे घटनास्थळी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता.

आत्महत्येपूर्वी योगेशने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्याने काही लोकांकडून त्रास दिला जात होता, असा उल्लेख केला होता. पोलीस आता या आधारे पुढील तपास करत आहेत.