कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी उद्या गुरुवारी कोल्हापूर बंदचे आयोज़्‍ान केले असताना संयोजकांनी शांततेत आंदोलन पार पडावे यासाठी आचारसंहिता ठरवली आहे. कोणत्याही प्रकारचे अनुचित कृती करू नये, अशा सक्त सूचना संयोजकांनी दिल्या आहेत. तर प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतली असून पोलिसांनी कोल्हापूर, इचलकरंजीसह काही शहरांत संचलन केले.

कोल्हापुरात ठिय्या आंदोलन सुरू राहणार असून राज्य बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा बंद शांततेत पार  पडण्याकडे संयोजकांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी दोन पानांची आचारसंहिता बनवली आहे. त्यामध्ये अन्य घोषणा न देणे, अनुचित प्रकार पूर्णत: टाळणे यावर भर दिला आहे.

प्रशासन दक्ष

गुरुवारच्या  बंदच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. पूर्वी आंदोलनाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व गुन्हेगार पाश्र्वभूमीच्या ३४१ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. काहींना तर २४ तासांसाठी जिल्ह्यत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने दंगल काबूपथक, एसआरपी प्लाटून, राज्य राखीव दल, गृहरक्षक दलासह  तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. बुधवारी रात्री १२ पासून पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त नेमला असून, पोलीस मित्रांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे.

क्रांतीदिनी गनिमी काव्याने आंदोलन ; आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे बंदचे आवाहन

अमरावती  : शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या विनाविलंब मान्य कराव्यात, अशी आमची मागणी असताना राज्य शासनाचे दिरंगाईचे धोरण अवलंबले आहे. केवळ तारखांवर तारखा देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे रूपांतर मराठा ठोक मोर्चात झाले आहे. आता आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टला गनिमी काव्याने बंद पाळत ठोक आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अमरावती जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालय, औषध केंद्र, अ‍ॅम्ब्युलन्स, दूध सेवा, अग्निशमन सेवा यांना वगळण्यात आले आहे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, घाऊक व किरकोळ दुकाने, सर्व प्रकारची वाहतूक सेवा, एसटी, शहर बस, शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन, ऑटो, मिनी बस तसेच सर्व शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवणी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंदच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून आंदोलकांनी नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. उद्या सकाळी कार्यकर्त्यांना राजकमल चौकात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम वऱ्हाडातील शाळांना सुटी

अकोला, वाशीम अमरावती जिल्हय़ातील शाळा-महाविद्यालये उद्या, ९ ऑगस्टला एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मराठा समाजाने गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांसंदर्भात कोणतीही अनुचित घटना होऊ  नये, याची दक्षता म्हणून गुरुवारी एक दिवसाकरिता जिल्ह्यतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय बंद  ठेवण्याचे आदेश अकोला व वाशीम जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत. बंद शांततेत पार पाडण्यासाठी आंदोलनातील कार्यकर्ते, तसेच भाजप सहित सर्वपक्षीय सर्व समाजातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

सकल मराठा समाजाचे आज ठिय्या, रास्ता रोको आंदोलन

नगर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने उद्या, गुरुवारी क्रांतिदिनी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन व रास्ता रोकोचे आंदोलन जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पोलिस ड्रोनचाही वापर करणार आहेत. या आंदोलनामुळे काही शाळांनी सुटी दिली आहे, तर एसटी महामंडळाने बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी काल, मंगळवारी सायंकाळी यासंदर्भात सकल मराठा समाजातील विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. आंदोलनासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच राज्य शासनाची, मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांना समजावून सांगितली. शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्याऐवजी सकाळी ९ वाजता बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी समाजाच्या वतीने घेण्यात आला. आंदोलनात बाह्य़शक्ती घुसणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा बाह्य़शक्ती लक्षात आल्यास पोलिसांना कळवावे, तसेच अशा व्यक्तींचे मोबाईल शूटिंग करावे, अशीही सूचना करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १५० पोलिस अधिकारी, २ हजारावर पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.