डॉ. बाबासाहेब औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाने ग्रीक शैलीतील नाटय़ाविष्काराचा महोत्सव करण्याचे ठरविले आहे. ‘अॅगमेमनॉन’ असे या नाटकाचे नाव असून ते दोन दिवस होणार आहे. उद्या (शुक्रवार) पूर्वार्धात ग्रीककालीन युद्धपूर्व स्थिती व दुसऱ्या दिवशी उत्तरार्धात युद्धानंतरच्या स्थितीचे नाटय़ साकारले जाईल. हे नाटक रा. वि. पवार यांनी हिंदीमध्ये अनुवादित केले असून प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी दिग्दर्शित केले आहे.
इ. स. पूर्व पंधराव्या शतकातील ग्रीक जनजीवन उभे करताना राजेरजवाडे सामान्यांवर युद्ध कसे लादतात, याचे वर्णन या नाटकात आहे. ग्रीक शैलीतील या नाटकाचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. इस्किलस या लेखकाने लिहिलेले हे नाटक प्रथमच विद्यापीठाच्या नाटय़शास्त्राचे विद्यार्थी साकारत आहेत. नाटकात १३ पात्रे असून रमाकांत भालेराव व भरत जाधव यांचे संगीत आहे. रामदास ठोके यांची प्रकाशयोजना आहे. या नाटय़प्रयोगापूर्वी कलावंतांनी ४ महिने तालीम केली. युद्ध हे सर्वत्र व आजच्याही काळात थोपविलेच जाते. त्यात सर्वसामान्य माणसांचे कसे हाल होतात, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न नाटकातून केला असल्याचे दिग्दर्शक डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी सांगितले. ‘अॅगमेमनॉन’ हा राजा होता. त्याला ट्रॉय या नगर राज्यावर कब्जा हवा होता. त्यासाठी काय आणि कसे घडले याचे वर्णन नाटकात आहे.