सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे ७वे वार्षिक अधिवेशन येत्या रविवार ३१ जानेवारी रोजी वसुंधरा, जिल्हा विज्ञान केंद्र नेरुरपार, ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. संस्थापक सी. बी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व वक्ते मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणचे माजी प्राचार्य रवींद्र येवले व वसुंधराचे प्रकल्प प्रमुख केशरी पटाडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. सन २०१३-१४ व सन २०१४-१५ मधील प्रज्ञा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०१५ मधील गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणारे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, प्रश्नमंजूषा स्पर्धेतील पहिले तीन गट, शिक्षकांच्या निबंध स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक, महाराष्ट्र शासनाचा सन २०१३-१४ व सन २०१४-१५ राज्य पुरस्कारप्राप्त माध्यमिक शिक्षक यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. मनोरंजनात्मक व आनंददायी गणित शिक्षक व शिक्षण या विषयावर रवींद्र येवले आणि आजचा विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर केदारी पठारे व्याख्यान देणार आहेत. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष औदुंबर भागवत व कार्यवाह वामन खोत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी औदुंबर भागवत ९४२११४७५१३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गोविंदराव पटवर्धन पुण्यस्मरण
जेष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांचा पुण्यस्मरण दिन रविवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा. श्रीराम वाचन मंदिरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध ऑर्गनवादक विलास हर्षे (रत्नागिरी) आणि राजापूर केळशी येथील अभंगवाणी गायक बंडुकाका भागवत यांचे अभंगवाणी गायन होणार आहे. त्यांना तबला साथ सिद्धेश कुंठे (कुडाळ) करणार आहेत. सर्वानी उपस्थिती दर्शवावी असे चंद्रकांत घाटे यांनी आवाहन केले आहे.