कोंबडीचे मांस २४०, तर बोकडाचे मांस ८०० रुपये प्रतिकिलो

निखिल मेस्त्री, पालघर

पालघर : करोनाकाळात एकीकडे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली असतानाच दुसरीकडे कोंबडी व बोकडाच्या मांसाचे दर गगनाला भिडल्याने मांसाहार सेवन करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

काही दिवसांपूर्वी १०० ते १२० रुपये प्रतिकिलोने मिळणारे कोंबडीचे मांस सध्या २२० ते २४० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच कोंबडीच्या मांसाचे दर काही दिवसात दुप्पट झाले, तर ४५० ते ५०० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या बोकडाच्या मांसाचे दर ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. ही दरवाढ दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांना मांसाहारी जेवण परवडेनासे झाले आहे. पोल्ट्रीमधून मिळणाऱ्या ब्रॉयलर कोंबडय़ा आणि बोकड यांची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ मांसविक्रीवर जाणवत आहे.

पालघरमध्ये अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी करोना प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्या पोल्ट्री बंद ठेवल्या आहेत. काही ठिकाणी त्या सुरू असल्या तरी त्यांचे दर वाढले आहेत. कोंबडीचा दर पोल्ट्रीमधून प्रतिकिलो ११८ ते १२० रुपये इतका आहे. पोल्ट्रीमधून या कोंबडय़ा काही मध्यस्थ व्यावसायिकांमार्फत उचलल्या जातात आणि त्या किरकोळ मांस विक्रेत्यांना १३० ते १३५ रुपये किलो दराने विकतात. पुढे किरकोळ विक्रेते नफा कमवून अधिक भावाने विकतात. यामध्ये जिवंत कोंबडी, कोंबडीचे मांस अशा पद्धतीने विक्री होते. जिवंत कोंबडी १८० ते २०० रुपये प्रति किलो असून कोंबडीचे मांस तब्बल २४० रुपये प्रतिकिलो आहे. गेल्या तीन वर्षांतील कोंबडी व बोकडाच्या मांसाचे दरवाढ झाल्याची ही विक्रमी नोंद आहे.

टाळेबंदीच्या काळात बोकडाच्या मांसाची विक्री वाढली. त्यामुळे आवक घटल्याने त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या मटण ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.

कुक्कुटपालन करण्यासाठी पूर्वी कोंबडीची पिल्ले १८ रुपये प्रतिनग दराने मिळत होती. तसेच त्याची आवकही घटली आहे. मात्र जी पिल्ले मिळत आहेत, त्याचे दरही दुप्पट झाले आहेत. कुक्कुटपालनाचा उत्पादन खर्च वाढत आहे. परिणामी दरवाढ होत आहे.

– अनिल राजपूत, कुक्कुटपालक