फक्त चार महाविद्यालयांचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशिक्षण कालावधी कमी करण्याचा विचार

नाशिक : आरोग्यदायी जीवनासाठी योग साधना महत्वाची ठरते. तणाव दूर करण्यासोबत प्रकृती उत्तम ठेवण्यास तिचा उपयोग होतो. सर्वसामान्यांचे आरोग्य सुदृढ राखण्याचे शिक्षण देणाऱ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना मात्र योग साधनेचे वावडे असल्याचे समोर आले आहे. योगाचे महत्व लक्षात घेऊन आरोग्य विद्यापीठाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांना योग साधनेचे प्रशिक्षण देण्याची संकल्पना मांडली. परंतु, त्यास ३४६ पैकी केवळ तीन ते चार महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अपेक्षित शिक्षक मिळत नसल्याने विद्यापीठावर शिबिराचा कालावधी कमी करणे वा टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणे यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

जागतिक पातळीवर योगाला मान्यता मिळाल्यानंतर जागतिक योग दिवस देशातही मोठय़ा उत्साहात साजरा होऊ लागला आहे. शिक्षण विभागाने मध्यंतरी राज्यातील शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय योग विद्येचा प्रचार, विकास करण्यासाठी दरवर्षी १२ ते २६ जानेवारी या कालावधीत योग उत्सवाचे आयोजन करण्यास सुचविले होते. जागतिक योग दिन गेल्या महिन्यात सर्वत्र साजरा झाला. शिक्षण संस्थांमध्ये योग उत्सव साजरा होतो की नाही याबद्दल अस्पष्टता आहे. या पाश्र्वभूमीवर, आरोग्य विद्यापीठाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षकांना सुदृढ, तणावमुक्त आयुष्य जगता यावे या उद्देशाने योगाचे शिक्षण देण्यासाठी क्रीडा शिक्षक आणि इच्छुक शिक्षकांना प्रथम प्रशिक्षित करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली आहे. विद्यापीठाच्या मुख्यालयात ऑगस्ट २०१८ मध्ये हे ३० दिवसीय योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे नियोजन आहे.

प्रशिक्षण काळात शिक्षकांना विद्यापीठामार्फत नि:शुल्क निवास, न्याहारी, भोजन व्यवस्था पुरविण्यात येईल. शिबिरासाठी पाच हजार रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले. प्रशिक्षणाशी संबंधित प्रशिक्षकांचे मानधन, अभ्यासक्रमासाठीचे साहित्य आदींची उपलब्धता विद्यापीठ करणार आहे.

या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा बाळगत विद्यापीठाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर अधिकतम २५ जणांना सहभागी करण्याचे निश्चित केले होते. त्याकरिता पाच जुलै २०१८ पर्यंत नोंदणी करण्यास अंतिम मुदत देण्यात आली. तथापि, या मुदतीत केवळ तीन ते चार महाविद्यालयांनी आपला एक शिक्षक शिबिरास पाठविण्याची तयारी दाखविली.

वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ प्रशिक्षणार्थीचे लक्ष्य गाठता आलेले नाही. परिणामी, विद्यापीठाच्या नियोजित योग शिबिराच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन आरोग्य विद्यापीठाने शिबिराचा कालावधी कमी करणे वा दोन टप्प्यात प्रशिक्षण देणे आदी पर्यायांवर विचार सुरू केला आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयांना नव्याने परिपत्रक काढून माहिती दिली जाणार आहे.

उद्देश काय ?

आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यात विविध विद्याशाखांची एकूण ३४६ महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयात एक क्रीडा शिक्षक आहे. क्रीडा शिक्षकांना योगाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन त्यांनी आपापल्या महाविद्यालयात इतर शिक्षक, विद्यार्थ्यांना आठवडय़ातून किमान चार दिवस सकाळी योग साधनाचे प्रशिक्षण द्यावे, असे विद्यापीठाला अभिप्रेत आहे.

महाविद्यालय, शिक्षकांच्या अडचणी

योग प्रशिक्षणाचा ३० दिवसांचा कालावधी मोठा आहे. क्रीडा शिक्षकांवर महाविद्यालयातील अन्य कामांची जबाबदारी असते. या स्थितीत वैद्यकीय महाविद्यालये संबंधितांना सोडण्यास तयार नाहीत. क्रीडा शिक्षकांना पाठविले जात नसताना इतर शिक्षकांनी रस दाखविलेला नाही.

वैद्यकीय महाविद्यालयांनी योग प्रशिक्षण शिबिरासाठी शिक्षक पाठविण्यास वेगवेगळ्या अडचणी कथन केल्या आहेत. त्या लक्षात घेऊन योग प्रशिक्षणाचा कालावधी कमी करणे किंवा दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्याच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.

– डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, आरोग्य विद्यापीठ