काश्मीरप्रमाणे उद्या महाराष्ट्राचे लचके तोडले जातील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. “आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून इतर राज्यांसाठीही लागू आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्या महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही तर मराठी म्हणून फिरेल असा इशारा राज ठाकरे यांनी व्हॉट्सअॅपवर प्रचार करणाऱ्या भाजपा समर्थकांना दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“नरेंद्र मोदींनी ३७० कलम रद्द करण्याबद्दल सांगताना काश्मीरात आम्ही रोजगार निर्माण करु असं आश्वासन दिलं आहे. पण मग ज्या राज्यात तरुण बेरोजगार होतोय त्या राज्यांचं काय ? तिथे तर ३७० कलम नाही आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात रोजगार नाही…महाराष्ट्रातही अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत. येथे तर ३७० कलम नाही. जर तुम्ही रोजगार निर्माण करु शकत नसाल तर मग कोणतं ३७० कलम घेऊन बसला आहात ?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन केंद्र सरकावर टीका केली असून ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. ३७० कलमावर पेढे वाटले जात आहेत, पण ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे असा संताप व्यक्त केला. “कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

यावेळी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट करताना सांगितलं की, “भाजपामधील एक वरिष्ठ व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत. कोण बोललं, कधी बोललं हे बाळा नांदगावकर यांना माहिती आहे”.

राज ठाकरे यांनी देशाची अर्थव्यवस्था धोक्यात असल्याची टीका यावेळी केली. “जेट एअरवेज बंद झाली, एअर इंडिया तोट्यात असून बीएसएनएलला ५४ हजार कोटींचा तोटा झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडे कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशाचं वाहन क्षेत्रं प्रचंड अडचणीत त्यामुळे किमान 10 लाख कुटुंब अडचणीत येणार”, असल्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

युएपीए या कायद्याची भारताला गरजच नाही, उलट त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असल्याची भीती यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली. “माहितीचा अधिकार कायद्यात निवडणुकांनंतर बदल करण्यात आला असून सर्व सूत्रं केंद्राच्या हाती आहेत. केंद्र म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दुर्लक्ष व्हावं यासाठी या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या जात आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली. नोकरी करणारे जे नमोभक्त आहे त्यांच्या मालकांवर कुऱ्हाड बसली की त्यांना कळेल असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मोदी समर्थकही आज शिव्या घालत आहेत. काहीतरी चांगलं घडेल म्हणून निवडून दिलं होतं, पण त्यांना फिकीरच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.