सोलापूर शहर व जिल्ह्यात मोहरमच्या पवित्र उत्सवास प्रारंभ झाला असून सोमवारी शहरात सुमारे २५० ताबूत, पंज्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, येत्या २२ तारखेला दसरा व धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिन व मोहरमच्या काही मिरवणुका एकाचवेळी निघणार आहेत. त्यामुळे त्यादिवशी थोरल्या मौलाली व अकबरअली पंजांच्या मिरवणुका न काढता सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी परस्पर सामंजस्याची स्तुत्य भूमिका शहर मोहरम समितीने घेतली आहे.
मोहरम समितीने दाखविलेला हा सामंजस्यपणा यंदा पहिल्यांदाच दाखविला नाही तर यापूर्वी १९८२-८३ ते १९८७-८८ या सलग सहा वर्षांत मोहरम उत्सवाबरोबर सुरुवातीला तीन वष्रे नवरात्रौत्स आणि नंतर सलग तीन वष्रे गणेशोत्सव एकत्र आला असता. त्यावेळी मोहरम समितीने ताबुतांसह पंजांच्या मिरवणुका काढल्या नव्हत्या. त्यानंतर यंदा नवरात्रौत्सव व मोहरम एकत्र आला आहे.
येत्या २२ आक्टोबर रोजी दसरा असून त्यादिवशी शक्तिदेवी मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. त्याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिनानिमित्त आंबेडकरी समाजबांधव भव्य शोभायात्रा काढणार आहेत. याच दिवशी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संचलन होणार आहे. या दिवशी मोहरमच्या ८ तारखेला रात्री मौलाली, अकबरअली, घोडेपीर आदी मानाच्या सवा-यांच्या मिरवणुका निघतात. एकाचवेळी दसरा, धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिन व रा. स्व. संघ स्वयंसेवकांचे संचलन आणि मोहरममधील सवा-यांच्या मिरवणुका निघणार असल्यामुळे पोलीस प्रशासनावर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखताना मोठा ताण पडणार आहे.
या पाश्र्वभूमीवर शहर मोहरम समितीने दस-याच्या दिवशी निघणा-या मानाच्या सवा-यांच्या मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला आहे. भुसार गल्लीतील थोरले मौलाली आणि बाळीवेशीतील थोरले अकबरअली पंजांचा भेटीचा औपचारिक सोहळा मंगळवार पेठ पोलीस चौकीसमोर होईल. त्यानंतर दोन्ही सवा-या पुढे आसार शरीफच्या भेटीसाठी न जाता माघारी फिरतील, असे शहर मोहरम समितीचे अध्यक्ष, माजी महापौर खाजादाऊद नालबंद यांनी सांगितले.
दसरा दिवस वगळता उर्वरित दिवशी पंजे व सवा-यांच्या पारंपरिक मिरवणुका निघणार आहेत, असे नालबंद यांनी नमूद केले.