काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर माझ्यासमोर दोन पर्याय होते, मी एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वतःचा नवीन पक्ष सुरु करणे हे पर्याय माझ्यासमोर होते. यातील दुसरा पर्याय मी निवडला असून ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे माझ्या पक्षाचे नाव असेल असे सांगत नारायण राणेंनी राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात केली. शिवसेनेवर घणाघाती टीका करतानाच बुलेट ट्रेनचे समर्थन करत राणेंनी त्यांचा राजकीय शत्रू कोण असेल याचे संकेतही दिले.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नारायण राणेंनी रविवारी नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे माझ्या पक्षाचे नाव असून ‘देऊ शब्द तो पुरा करू’ असे आमच्या पक्षाचे ब्रिद वाक्य असेल असे नारायण राणेंनी जाहीर केले. माझ्या पक्षाची लवकरच नोंदणी करणार आहे. माझा पक्ष सर्वसामान्य माणसांसोबत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षात कोणकोण येणार असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, आता मी दुकान उघडले असून कोण आमच्यासोबत येणार हे आगामी काळात कळेल.

राज्यावर साडे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असून कर्जावर नियंत्रण ठेवायचं असेल तर उत्पन्न वाढवण्यासाठी कर लावावे लागतात. तुम्हाला विकासही हवा आणि कराचा भार आल्यावर टीकाही करणार, तुम्ही दोन्ही बाजूंनी प्रश्न उपस्थित करु शकत नाही असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांची फसवणूक केली असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. माझं काम केले नाही म्हणून मी कोणाचाही विरोध करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा मोदींचा प्रवास कौतुकास्पदच आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता, या मतावर मी अजूनही ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तर सत्ताधाऱ्यांसारखी भूमिका घेईन आणि विरोधात असलो तरी विरोधकाची भूमिका घेईन असे त्यांनी सांगितले.

पदासाठी मी काम करतो असे काही नाही. काँग्रेसनेच मला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते अशी आठवण राणेंनी करुन दिली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम आहे असेही त्यांनी नमूद केले. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही. पदासाठी मी तडजोड करणार नाही असे त्यांनी सांगितले.