देशातील जिल्हा बँकांना आदर्श बँकिंगचे धडे देण्यासाठी आता रायगड पॅटर्न वापरला जाणार आहे. नावीन्यपूर्ण योजना आणि लक्षवेधी कामातून आपली छाप सोडणाऱ्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर डॉक्युमेंटरी तयार करण्याचा निर्णय नाबार्डने घेतला आहे. डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी हैद्राबादच्या एका एजन्सीची नेमणूकही करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने कात टाकली आहे. नावीन्यपूर्ण योजना राबवून कमी कर्मचाऱ्यांमध्ये दर्जेदार काम कसे केले जाऊ शकते याचा आदर्श दाखवून दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कामाची प्रेरणा देशातील इतर मध्यवर्ती बँकांनाही मिळावी यासाठी आता एक डॉक्युमेंटरी तयार केली जाणार आहे. तब्बल १४ भाषांमध्ये तयार होणाऱ्या डॉक्युमेंटरीचा सर्व खर्च नाबार्ड स्वत: करणार आहे. हैद्राबादच्या एका एजन्सीची या डॉक्युमेंटरीच्या निर्मितीसाठी निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या ३० टीम्सकडून बँकेच्या लक्षवेधी कामाचे डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे. चित्रीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. येत्या महिन्याभरात ही डॉक्युमेंटरी तयार होणार असून त्यानंतर नाबार्डच्या माध्यमातून देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांना ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे.
 रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक ही आयएसओ नामांकन मिळवणारी देशातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. शिवाय वैद्यनाथन समितीच्या अहवालापूर्वी सस्था एकत्रीकरण करणारी देशातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. बँकेने कोर बँकिंग प्रणाली, स्वत:चे डेटा सेंटर, एटीएम सुविधा यासारख्या नावीन्यपूर्ण योजना प्रत्यक्षात साकारल्या आहेत, गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने नफ्यात असलेली आणि ऑडिटचा अ वर्ग मिळवणारी ही बँक ठरली आहे. बँकेचा नेट एन पी ए शून्य आहे. स्मार्ट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची अभिनव योजना देशात पहिल्यांदा राबविण्याचा मान बँकेला मिळतो आहे. येत्या महिन्याभरात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. ५५ शाखा, १७४ संस्थांच्या या बँकेत नाबार्डच्या निकषापेक्षाही सध्या कमी कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कामाची दखल नाबार्डचे अध्यक्ष डॉ. बक्षी यांनी घेतल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात रायगड जिल्हा बँकेचा हा पॅटर्न इतर बँकांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांना दर्जेदार सुविधा देण्याचे उद्दिष्ट बँकेने आजवर ठेवले आहे, यापुढेही ते कायम राहील, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.