वष्रेभरापासून अहेरी परिसरातील अनेक कारवायांमध्ये सहभागी

थंडावलेल्या नक्षल चळवळीला आक्रमक करण्याची जबाबदारी जहाल नक्षलवादी व आदिलाबाद विभागीय समितीचा सचिव चार्लेस उर्फ अथराम शोभनवर सोपविण्यात आली होती. त्यातूनच शोभन गेल्या वष्रेभरापासून अहेरी परिसरात सक्रीय होता. त्याच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांनी अहेरी परिसरात अनेक घटना घडवल्या. मात्र, यावेळी तेलंगणा व महाराष्ट्र पोलिस दलाच्या चक्रव्युहात खुद्द अथरामच अडकला आणि ठार झाला. दरम्यान, अथयनसह तिन्ही नक्षलवाद्यांच्या मृतदेहावर कुटुंबीयांनी दावा केल्यानंतर ते त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

पूर्वीचा आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणातून नक्षल चळवळ संपुष्टात आलेली आहे. मात्र, चार्लेस उर्फे अथराम शोभनने मात्र ही चळवळ जिवंत ठेवली होती. तेलंगणा पोलिस दलाने नक्षलवाद्यांविरोधात ग्रे हाऊंट्स मोहीम सुरू केल्यावर अथरामला आदिलाबाद परिसरातून प्राणहिता नदी पार करून वारंवार अहेरीच्या काटेपल्लीच्या जंगलात आश्रयास यावे लागत होते. गेल्या वष्रेभरात अथराम काटेपल्लीच्या जंगलात सातत्याने येत होता. ही माहिती गुप्त सूत्रांकडून तेलंगणा व महाराष्ट्र पोलिसांना मिळाल्यामुळे दोन्ही राज्याचे पोलिस अथराम व त्याच्या सहकाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दुसरीकडे वरिष्ठ कॅडरच्या नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या जंगलात थंडावत चाललेल्या या चळवळीत आक्रमक करण्याची जबाबदारी सर्वस्वी अथरामवर सोपविली होती. त्यामुळेही अथराम वारंवार काटेपल्लीच्या जंगलात मुक्कामी असायचा. त्याच्या नेतृत्वाखाली अहेरी परिसरात अनेक चकमकी झाल्या. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलावर कंत्राटदारांच्या वाहनांची जाळपोळ ही त्याच्याच इशाऱ्यावरून करण्यात आली होती, तसेच छत्तीसगडमधून गडचिरोलीत आलेले तरुण नक्षलवादीही त्याच्या संपर्कात होते. दिनेश आणि मुकेश हे दोन्ही युवा नक्षलवादी वष्रेभरापासून त्याचे सहकारी होते, अशीही माहिती आहे.

गडचिरोलीच्या जंगलात चळवळीला आक्रमक करणे सुरू असतांनाच तेलंगणा व महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तपणे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली झाल्याने ही मोहीम काहीशी मागे पडली. मात्र, शनिवार आणि रविवारी अथराम काटेपल्लीच्या जंगलात मुक्कामी असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून दोन्ही पोलिस दलांना मिळताच नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले. नेमका याच वेळी दोन्ही राज्याच्या पोलिसांनी रचलेल्या चक्रव्युहात अथराम अडकला आणि चकमकीत मारला गेला. त्यामुळे नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. कारण, महिनाभरापूर्वीच रजिता ही जहाल नक्षलवादी चकमकीत ठार झाली. त्यापाठोपाठ नक्षल चळवळीचा खंदा नेता अथरामही ठार झाल्याने ही चळवळ आता पूर्णत: खिळखिळी झाली आहे. विशेष म्हणजे, अथरामकडे खंडणी गोळा करण्याची जबाबदारी होती. तो कंत्राटदार व व्यावसायिकांना धमकावून मोठय़ा प्रमाणात खंडणी गोळा करीत होता. त्याच्या ठार होण्याने चळवळीचे अर्थकारणही बिघडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, अथराम ठार झाल्याची वार्ता कळताच त्याचे मामा व कुटुंबीय सोमवारी गडचिरोलीत आले. त्यांनीच त्याच्या मृतदेहावर दावा सांगितला. शवविच्छेदनानंतर अथरामचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली, तसेच मुकेश व दिनेशचे मृतदेहही त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईचे संपूर्ण श्रेय गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे व तेलंगणा पोलिसांचे आहे.