“आता आम्ही कुठलाही पक्ष पहात नाही. आता फक्त माणुसकी पहाणं गरजेचं आहे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. “माणुसकीच्या नात्याने आम्ही आमचे सगळे प्रयत्न करत आहोत. सर्वजण सहकार्य करत आहात. घरात ३०-३५ दिवस राहणं सोपं नाही. आपण सगळे अडचणीवर मात करतोय त्यामुळे हा प्रश्न सुटल्यावर नक्की चांगलं घडेल,” अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. तसंच महाराष्ट्रात कोणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी आज फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला.

“या काळात आम्हाला राजकारण करायचं नाहीय तर समाजकारण करायचं आहे. मोदीसाहेबांच्या सरकारच्या सूचनांचे पालन करून हातात हात घालून राज्यसरकार २४ तास दिलेल्या सूचना असतील किंवा आम्ही केलेल्या सूचना असतील त्याचे पालन करण्याचे काम करत आहोत. यानुसार अतिथी देवो भव म्हणत आपल्यासाठी आपल्या राज्यात येऊन काम करणारे प्रत्येकजण महाराष्ट्राच्या जडणघडणीत तयार झालेले मजुर असो किंवा अन्य कुणी त्यांचा मानसन्मान केला जात आहे. त्याला अन्नधान्याची मदत केली जात आहे. माझ्या महाराष्ट्रात कुणालाही उपाशीपोटी राहू देणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेले ३० दिवस मतदारसंघात इच्छा असूनही जायला मिळत नाही. माझ्या आयुष्यात खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं आहे. मात्र तरीही झूम कॉल, लॅण्डलाईनवरून २४ तास देशात, राज्यात आणि मतदारसंघात जनतेशी, संघटनेतील लोकांशी संपर्कात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून प्रयत्न
“अन्नधान्याची अडचण येत आहे. त्यासाठी शरद पवार हे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी सातत्याने संपर्क करत आहेत. याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही अन्न धान्य कमी पडू नये म्हणून सतत काम करत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. अधिकारी वर्गाशी संपर्क करत आहेत. त्यातूनही टीका होत आहे. मात्र एक आपल्या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी राहणार नाही असा शब्द देतानाच ही राजकारण करायची वेळ नाही टिका करा पण ही वेळ ती नाही,” असं त्या म्हणाल्या. “कोरोनावर मात केल्यावर दिलदारपणाने टीका करा तो विरोधकांचा अधिकार आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.