महाराष्ट्राचे भाजपा आणि शिवसेनेचे सरकार म्हणजे लोकशाही पायदळी तुडवणारे सरकार आहे अशी टीका आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे. राज्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांची साधी जाणीवही नाही. सत्तेच्या गुर्मीत मस्तवालपणे जगणारे सत्ताधारी लोकशाही पायदळी तुडवत आहेत. ही गोष्ट म्हणजे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दुर्दैव आहे. असेही राष्ट्रवादीने ट्विट केले आहे.

राष्ट्रवादीने ट्विट केलेल्या व्यंगचित्रात एक सत्तेची मस्ती अशी झुल पांघरलेला एक हत्ती दाखवण्यात आला आहे. या हत्तीवरच्या अंबारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दाखवण्यात आले आहे. त्यांच्यामागे एक माणूस चालताना दाखवला आहे. विकास की भकास असे त्याच्यापुढे लिहिण्यात आले आहे. तसेच सत्तेची मस्ती अशी झुल पांघरलेला हत्ती कायदा आणि सुव्यवस्था, स्त्री सुरक्षा, शेतकरी हे प्रश्न पायदळी तुडवत चालला आहे आणि लोकशाहीच्या झाडाला टक्कर देतो आहे असेही या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. आता राष्ट्रवादीने ट्विट केलेल्या या व्यंगचित्राला सत्ताधारी कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.