|| रवींद्र जुनारकर 

 

नेलगोंडा (गडचिरोली) : रस्ते, वीज, भव्य वास्तू आणि भौतिक सुखसुविधा असेल तरच एका उत्कृष्ट शाळेची निर्मिती होते हा विचार नेलगुंडाच्या साधना विद्यालयाने पूर्णत: खोडून काढला आहे. निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात १३१ विद्यार्थी येथे बालवाडीपासून तर पाचव्या वर्गापर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाची ओढ असलेले लगतच्या छत्तीसगड राज्यातील सहा विद्यार्थी १५ ते २० किलोमीटर अंतराची पायपीट करून येत आहेत.

प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्पाची निर्मिती केली. पद्मश्री डॉ.प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे दाम्पत्याने या प्रकल्पाला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले आहे. आजोबा बाबा आमटे आणि आई-वडील डॉ.प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आमटे परिवाराची तिसरी पिढी सामाजिक कार्यात सक्रिय झाली आहे. डॉ. दिगंत आमटे यांनी लोकबिरादरीच्या हॉस्पिटलमधून रुग्णांची सेवा सुरू केली आहे तर अनिकेत व समीक्षा आमटे यांनी भामरागड येथून १८ किलो मीटर अंतरावर असलेल्या नेलगोंडा येथे साधना विद्यालय सुरू केले आहे. बालवाडी ते पाचव्या वर्गापर्यंत येथे १३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या नेलगोंडाच्या शाळेत परिसरातील आजूबाजूच्या गावातील मुलं- मुली शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र आता साधना विद्यालयाची महती लगतच्या छत्तीसगड राज्यातही पोहचली आहे. त्यामुळेच छत्तीसगड येथून सहा विद्यार्थी दररोज १८ ते २० किलोमीटरचा प्रवास कधी सायकलने तर कधी पायदळ करून नदी, नाले पार करीत येथे शिक्षणासाठी येत आहे. शिक्षणाची ओढ असल्यामुळेच या चिमूकल्या विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे.

अनिकेत यांनी आजी साधनाताई आमटे यांच्या नावाने ही शाळा सुरू केली आहे. सुरुवातीला या शाळेत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. परंतु आता दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे, या शाळेत कुठल्याही सुखवस्तू नाहीत. मुलं- मुली एकत्रित अभ्यास करतात, त्यानंतर शाळेच्या क्रीडांगणात खेळतात, मौजमस्ती करतात. त्यामुळेच ही शाळा आज सर्वाना आपलीशी झाली आहे.