कळसूबाईचे शिखर नुकतेच विजेच्या प्रकाशाने उजळून निघाल्यानंतर कळसूबाईवर रोप वे नेण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सह्याद्रीतील या सर्वोच्च शिखरावर आबालवृद्धांना सभोवतालचा निसर्ग निरखित पोहोचणे शक्य होणार आहे.
नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील १ हजार ६४६ मीटर उंचीचे कळसूबाई शिखर सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे गिर्यारोहकांना कळसूबाईची चढाई नेहमीच साद घालत असते. वर्षांचे बाराही महिने गिर्यारोहकांचा येथे राबता असतो. शिखरावर कळसूबाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. परिसरातील आदिवासी समाजासह अनेकांची कुलदेवता आहे. नवरात्राचा उत्सव शिखरावरील मंदिरात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस येथील भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळते.
अकोले तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने पर्यटन विकासाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत कळसूबाई शिखराचे विद्युतीकरण करण्यात आले. शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या बारी गावापासून सुमारे सहा किमी लांबीची केबल टाकण्यात आली. अंतिम टप्प्यात दहा विजेचे पोल उभे करण्यात आले. या अवघड कामासाठी परिसरातील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते नुकतेच या विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. ‘साहेब काहीही करा, पण देवावर दिवा लावा’ ही या परिसरातील लोकांची सातत्याने करण्यात येणारी मागणी होती. राज्यातील या अतिउंच शिखरावर वीज नेण्याचे काम मी करू शकलो. भाविकांची इच्छा पूर्ण करता आली. आपल्या जीवनातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. कळसूबाईवर रोप वे करण्याचा मनोदयही त्यांनी या वेळी व्यक्त केला. पर्यटन विभागामार्फत रोप वेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कळसूबाई शिखराच्या पहिल्या टप्प्यावरही देवीचे एक मंदिर आहे. त्या ठिकाणी ५० लाख रुपये खर्च करून भक्तनिवासाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच शिखरावर असणारी जुनी विहीर रुंद व खोल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्युतीकरणाच्या या कामासाठी सुमारे ९३ लाख रुपये खर्च आला. राज्यातील या सर्वात उंच शिखरावर चढून जाणे ही या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचीच इच्छा असते. पण अनेकांना ते शक्य होत नाही. रोप वे झाल्यास रायगडाप्रमाणे सर्वानाच रोप वेने शिखरावर जाता येणे शक्य होणार आहे. शिखरावरून दिसणारा विस्तीर्ण परिसर त्यातील सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, भंडारदऱ्याचा जलाशय आणि जोडीला भन्नाट वाहणारा उनाड रानवारा सर्वत्र मन हरखून जाईल असेच हे दृश्य असते.