दुपारी दोन वेळा धो-धो पाऊस आणि काही तासांत पुन्हा स्वच्छ ऊन, दुपारच्या पावसात रस्त्यांवर वाहते पाणी आणि काही वेळाने पडलेल्या उन्हात कोरडेठाक रस्ते.. यंदाच्या श्रावणातील हे चित्र रविवारीही कायम होते. पावसाळ्यातील दोन-अडीच महिने चांगल्या दमदार पावसाच्या अनिश्चिततेत सरले. आताही यात फरक पडलेला नाही. श्रावणात तरी चांगले काही घडेल ही सर्वाची आशा-अपेक्षा आहे. मात्र, वरुणराजाला हे मान्य नसावे. त्यामुळेच दिवसा कधीही जेमतेम हजेरी लावण्यापुरता येणारा श्रावणातील पाऊस आला म्हणेपर्यंत गायबही होऊन जातो..
‘श्रावणात घन निळा बरसला’ हे प्रसिद्ध गाणे एरवीही मराठी मनात घर करून असते. परंतु प्रत्यक्ष श्रावण महिना सुरू होऊन दोन आठवडे झाले, तरी श्रावणातील रिमझिमचा जेमतेम अपवाद वगळता, दमदार सरींचा प्रत्यय अजूनही आला नाही. मुंबई-पुणे आणि कोकण, विदर्भात या पावसाळ्यात उशिराने का होईना दमदार बरसलेला पाऊस श्रावणातील नजाकत अनुभवण्यापुरताही मराठवाडय़ास  पारखा झाला आहे. औरंगाबाद शहरात शनिवारप्रमाणेच रविवारीही भरदुपारी तीन-साडेतीनच्या दरम्यान पाच-दहा मिनिटांच्या दोन सरी येऊन गेल्या. टपोऱ्या थेंबांसह बरसलेल्या या पावसामुळे आनंदाची अनुभूती आता घर करणार, असे वाटत असतानाच काही वेळातच पावसाने धूम ठोकली. काही वेळाने साडेचारपासून नेहमीप्रमाणे कडक ऊनही पडले. संध्याकाळी उशिरापर्यंत उन्हाचा प्रभाव टिकून होता. त्यामुळे काही तासांपूर्वी पाऊस पडला, असे वाटण्याइतपत चित्रही जाणवेनासे झाले.
मध्यंतरी रिमझिम स्वरूपातच पडलेल्या पावसामुळे प्रामुख्याने पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी लोटली असली, तरी पावसाअभावी शेतकरी वर्गात मात्र काळजीचे काळे ढग दाटले आहेत. उद्याच्या चिंतेने बळिराजाला ग्रासले आहे. दुबार-तिबार पेरणी केल्यावर या चिंतेला आर्थिक चणचणीची काळवंडलेली किनार अधिकच टोकदार करीत आहे. सण-उत्सवामुळे काही क्षणांपुरते आनंद-उत्साहाचे चित्र असले, तरी पावसाच्या दमदार आगमनामुळे असणारी नजाकत या वातावरणाला यंदा तरी लाभली नाही.