दिल्लीश्वरांनी कांद्यासाठी थेट गल्लीत म्हणजे नाशिकला धाव घेऊन खरेदीसाठी चाचपणी केली असली तरी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील मागणीप्रमाणे संबंधितांना कांदा पुरविण्याचे सुतोवाच केले असले तरी या प्रक्रियेतील नाना अडथळ्यांमुळे किमान पुढील पंधरा दिवस दिल्लीला कांदा पाठविणे अशक्य असल्याचे दिसत आहे.
घटलेली आवक, खरेदीसाठी बाजारात तात्काळ मोजावे लागणारे पैसे, दिवाळीमुळे सलग काही दिवस बंद राहणारा बाजार आणि मजुरांची अनुपलब्धता ही त्याची कारणे आहेत. दिल्लीला कांदा पाठविण्याची तयारी दर्शविणाऱ्या भाजीपाला व फळे खरेदी-विक्री सहकारी संघाने (व्हेफ्को) महाराष्ट्र शासनासमोर या व्यवहाराची आर्थिक हमी घेण्याची अट ठेवली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र दिल्लीकरांची कांद्याची भूक कशी भागविणार, हा प्रश्न आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कांद्याने दिल्ली सरकारच्या डोळ्यात पाणी आणल्यामुळे धास्तावलेल्या तेथील अधिकाऱ्यांनी नाशिक गाठून सलग दोन दिवस कांद्याचा दर्जा, भाव, उपलब्धता आदींविषयी माहिती जाणून घेतली. त्यांनी शुक्रवारी ठिकठिकाणी भेटी देऊन बाजार समितीचे पदाधिकारी व नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी हे पथक दिल्लीकडे रवाना झाले. नाशिकहून कांदा खरेदीचा निर्णय दिल्ली सरकारच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत नाशिकहून कांदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला तरी तो पुढील दहा ते पंधरा दिवसात वास्तवात येऊ शकणार नाही. रविवारच्या सुटीनंतर पुढील आठवडय़ात बाजार समित्यांचे लिलाव तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या सलग काही दिवस सुटय़ा असल्याने बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे बंद राहील. सणोत्सवामुळे आपल्या घरी जाणारे मजूर आठ ते दहा दिवस परतण्याची शक्यता नाही. या अडचणींवर काही तोडगा निघाला तरी दिल्लीकरांना लागणाऱ्या चांगल्या दर्जाचा ४०० टन कांद्याची दररोज उपलब्धता करणे दिव्य आहे. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारात सध्या आवक कमालीची घटली आहे. त्यातच पावसामुळे नुकसानग्रस्त कांद्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. शिवाय, इतक्या मोठय़ा प्रमाणावर कांदा स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासाठी दररोज दीड ते दोन कोटी रूपये लागणार आहेत. दिल्ली सरकार तात्काळ पैसे देणार नसल्यास महाराष्ट्र शासनाने त्याची हमी घ्यावी, असे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांचे म्हणणे आहे.

दिल्लीकरांपुढे वांधेच
आर्थिक विषयाचा तिढा सुटल्यास स्थानिक बाजारातून कांदा खरेदी करता येईल. कांदा खरेदी केल्यावर दोन दिवस तो कोरडा करण्यात जातील. त्यानंतर रस्तेमार्गाने तो दिल्लीला पाठविता येईल. या प्रवासाला चार दिवसांचा अवधी लागेल. या सर्व बाबी लक्षात घेतल्यास नाशिकचा कांदा दिल्लीश्वरांसाठी तिखटच राहणार असल्याचे दिसत आहे.