बँक ग्राहकांचे एटीएम क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त करून त्यांना गंडा घालणाऱ्या ‘ऑनलाईन’ लुटारूंपैकी एकापर्यंत पोहोचण्यात अमरावती पोलिसांना यश आले असून शहरातील एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ६४ हजार परस्पर वळते करणाऱ्या आरोपीला झारखंड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
बँक अधिकारी असल्याची बतावणी करून बेसावध बँक ग्राहकांचे एटीएम क्रमांक आणि पिन मिळवायचे आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल ५० जणांना याच कार्यपद्धतीने गंडा घालण्यात आला आहे. गेल्या ६ ऑगस्टला संतोष मोहनलाल गुप्ता (३९,रा.रवीनगर) याला एका व्यक्तीचा मोबाईल क ॉल आला. त्यात त्याने आपण बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. आपले एटीएम ब्लॉक झाले असून तुम्ही तुमचा एटीएम क्रमांक आणि पीन क्रमांक सांगा. काही वेळानंतर तुमचे एटीएम अ‍ॅक्टिव्ह होईल आणि दुसरा पासवर्डही मिळेल, असे या तोतयाने सांगितले. संतोष गुप्ता यांनी आपल्या एटीएम क्रमांकाची माहिती संबंधिताला दिली आणि लगेच काही क्षणात त्याच्या बँक खात्यातून ६४ हजार ४२५ रुपये वळते करण्यात आल्याचा संदेश त्याला आला. गुप्ता यांनी लगेच राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार नोंदवली. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी तातडीने सूत्रे हलवून तांत्रिक पद्धतीने तपास केला आणि संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याचे वास्तव्य ठिकाण हुडकून काढले.
राजापेठ पोलिसांनी झारखंडमधील घोसबाद येथे राहणाऱ्या आरोपी आफताब अन्सारी उर्फ उल्फत मियां (३०) याला झारखंड पोलिसांच्या सहकार्याने त्याच्या घरून ताब्यात घेतले. आफताबच्या जवळून ६ मोबाईल आणि ८८ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आफताबला २२ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आफताब हा केवळ पाचवीपर्यंत शिकलेला असून तो गवंडीकाम करतो. त्याला संगणकाचेही फारसे ज्ञान नाही, पण त्याने आपल्या काही मित्रांसमवेत बँक ग्राहकांना फोन करून त्यांच्या एटीएमची माहिती मिळवायची आणि त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वळती करण्याचे प्रकार सुरू केले. या टोळीने आजवर किती लोकांना गंडा घेतला, याची माहिती घेतली जात आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. बनावट नावाने सीमकार्ड तयार करणे आणि त्याचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी करणे हे प्रकार वाढले आहेत. या लुटारूंची कार्यपद्धती सारखीच आहे. राजापेठ पोलिसांना एका प्रकरणात हा आरोपी गवसला आहे, पण आता अमरावती पोलिसांसमोर इतर प्रकरणातील लुटारूंचा शोध घेण्याचे आव्हान आहे.