संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांच्या संधी नगरच्या उद्योजकांना मिळवून देण्याचा प्रयत्न भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशप्रमुख प्रदीप पेशकार यांनी उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेला दिले. त्यासाठी उद्योग आघाडी नगरच्या उद्योजकांना आवश्यक मार्गदर्शन, इतर संघटनांशी संरक्षण उत्पादनाच्या तांत्रिक माहितीवर चर्चा घडवून आणली जाणार आहे.

केंद्र सरकारचे २० लाख कोटींचे पॅकेज तसेच ‘आत्मनिर्भर भारत‘ संकल्पनेतील योजना व सवलतींची माहिती देण्यासाठी उद्योग आघाडीच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान‘ प्रमुख अनंत देसाई यांच्या पुढाकाराने नगरच्या उद्योजकांसाठी वेबिनार घेण्यात आले. या परिसंवादात प्रदेश उपाध्यक्ष व अभियानचे राज्यप्रमुख माधव भंडारी, आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकार यांनी उद्योजकांना माहिती दिली.

मराठा चेम्बरचे शाखाध्यक्ष अरविंद पारगांवकर, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, संस्थापक अशोक सोनवणे, दिलीप अकोलकर, अरुण कुलकर्णी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, शिवाजी गोंदकर, ब्रिजलाल सारडा, पुरुषोत्तम नावंदर, संजय बंदिष्टी, महेश इंदाणी आदी सहभागी झाले होते.

चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन संधीची माहिती पेशकार यांनी दिली. संरक्षण साहित्य उत्पादन विकास, त्याचा आराखडा तयार करून उद्योजक ते कोईमतूर व नाशिक येथील संरक्षण विभाग यांच्या केंद्रांना पाठवू शकतात. औद्योगिक पुरवठादार विकसित करण्याचे काम त्यांच्याद्वारे होणार आहे. भाजपच्या आघाडीमार्फत याची माहिती नगरच्या उद्योजकांना दिली जाईल, उत्पादन निर्मितीची संधी आणि आवश्यक मार्गदर्शनही केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘आमी‘चे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी स्वागत व प्रास्तविक केले. महेश इंदाणी यांनी आभार मानले. चर्चेत नगरच्या १५० उद्योजकांनी सहभाग घेतला.

भारतीय उद्योगांना संधी- माधव भंडारी

भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणाले, करोनामुळे जगाचे अर्थकारण बदलत आहे. जगाची ‘फॅक्टरी‘ मानला जाणारा चीन करोनामुळे बाजूला फेकला जात आहे. अनेक देशांनी त्यांच्या वस्तूंवर निर्बंध आणले, चीनमधील औद्योगिक गुंतवणूकही काढून घेतली जात आहे. अशा स्थितीत जागतिक औद्योगिक अर्थकारणातील पोकळी भरून काढण्याची संधी भारताला असून, तेवढी बौद्धिक क्षमता, कुशलता व कष्ट करण्याची तयारी भारतीय उद्योजकतेत आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान‘ असून, यातून रोजगार निर्मिती व अर्थकारणालाही चालना मिळणार आहे.