एकाच कुटुंबातील चार जणांना अन्नातून विषबाधा होऊन त्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या या घटनेत बहिण-भाऊ असलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी आणि तिच्या आईवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संगमनेर तालुक्यातल्या मालदाड रोडवरील आंबेडकर नगर येथे ही घटना घडली आहे. दीपक सुपेकर यांच्या कुटुंबातील चौघांना ही विषबाधा झाली. कृष्णा (वय ६), श्रावणी (वय ९) आणि वैष्णवी या तीन मुलांसह पत्नी भगिरथी सुपेकर यांना ही विषबाधा झाली. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर या चौघांना सकाळी उलट्यांचा त्रास व्हायला लागला. यानंतर या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांदरम्यान कृष्णाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याचा रविवारी तर सोमवारी श्रावणी हिचा मृत्यू झाला. तर सुपेकर यांची मुलगी वैष्णवी आणि पत्नी भगिरथी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विषबाधा झालेल्या सर्वांनाच उलट्या, अतिसार आणि थंडीतापाचा त्रास होत होता. त्यात कृष्णा आणि श्रावणी यांचा अतिसाराने मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकणार आहे.