उस्मानाबाद येथील शेतमजुराच्या मुलासंदर्भातली पैशांमुळे मेडिकलचा प्रवेश रखडल्याची एक बातमी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर वाचली आणि तातडीने त्या मुलाला १ लाख ५१ हजारांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली.  उस्मानाबाद येथील भोगजी या ठिकाणी असलेल्या गोरख मुंडेने मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या NEET या परीक्षेत ५०५ गुण मिळवले. राज्यस्तरावर त्याने ३८८८ ही रँकही मिळवली. मेडिकलसाठी त्याचा सोलापूरच्या अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. मात्र आर्थिक आव्हानाला तोंड कसे द्यायचे हा गोरखपुढचा प्रश्न होता.

गोरख मुंडेला पुढील पाच दिवसात ४ लाख ६६ हजार रुपये शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्चाची रक्कम भरायची होती. जर ही रक्कम भरली नसती तर त्याचा प्रवेश रद्द होणार होता. यासंदर्भात एका वेबसाईटने एक वृत्त दिले आणि त्याचीच पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली. जी वाचल्यानंतर ग्रामविकास विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या विद्यार्थ्याला १ लाख ५१ हजारांची मदत दिली.

पंकजा मुंडे यांनी काय म्हटले आहे?
कृपया माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा.आपला प्रश्न मला व्यतिथ करतोय मी माझ्या परिने सोडवण्यासाठी प्रयत्न करते.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आपल्या पुढील शिक्षणासाठी रु १ ,५१,००० ची मदत आपल्याला करण्याची इच्छा आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

पंकजा मुंडे यांनी या विद्यार्थ्याला तातडीने १ लाख ५१ हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला मेडिकलला प्रवेश मिळण्यातली आर्थिक अडचण दूर होण्यास मदत झाली आहे.