ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील आगरझरी परिसरात एका आठ ते नऊ वर्षे वयाच्या वाघाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. ही बाब ताडोबा व्यवस्थापनाच्या वेळीच लक्षात येताच या वाघाला नागपूर लगतच्या गोरेवाडा प्राणी उपचार केंद्रात हलवण्यात आले आहे.

ताडोबा बफरच्या आगरझरी वनपरिक्षेत्रात हा वाघ सुस्त अवस्थेत पडलेला होता. त्याच्या आजूबाजूला वन्यप्राणी आले तरी तो काहीही हालचाली करत नव्हता. यावरून त्याला काहीतरी इजा झाली असावी किंवा तो जखमी झाला असावा असा अंदाज ताडोबातील टीमला आला. त्यानंतर त्याच्यावर आणखी लक्ष केंद्रीत केले गेले. मात्र तरीही त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याचे शरीराचे निरीक्षण केले असता काही भाग हलत होता, तर काही भाग अर्धांगवायूचा झटका आल्यासारखा वाटत होता.

अखेर, तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर बेशुध्दीचे इंजेक्शन देवून तपासणी केली असता, त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे आढळून आले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी वाघाला तत्काळ नागपूर लगतच्या गोरेवाडा प्राणी उपचार केंद्रात नेण्यात आल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. सध्या वाघाची प्रकृती ठीक असल्याचेही सांगण्यात येत आहे.