परळी-नगर रेल्वेच्या कामातील हलगर्जीपणा उघड

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावण्यापूर्वीच पिंपळा गावाजवळील रेल्वे पुलाची भिंत कोसळून माती भराव ढासळला. दुसऱ्या पुलाची भिंतच कलली आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन रेल्वेच्या नगर येथील द्विसदस्यीय अभियंता पथकाने पाहणी केली. रेल्वे आता संबंधितांवर काय कारवाई करते? याकडे लक्ष आहे. रेल्वेमार्गाच्या उभारणीत मुख्य ठेकेदाराने स्थानिक पातळीवर उपठेकेदार नेमून काम करून घेतल्यामुळे कामाचा दर्जा राहिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

परळी-बीड-नगर या बहुचíचत रेल्वेमार्गाचे काम आगामी दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी सरकार पातळीवरून सातत्याने कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नगर ते नारायणडोह यादरम्यान रेल्वे रुळाचे काम पूर्ण करून रेल्वे इंजिन धावण्याची चाचणीही घेण्यात आली. आष्टी ते बीडपर्यंत बहुतांशी ठिकाणी पुलांची कामे झाली असून रेल्वे रुळ अंथरणेही सुरू आहे. अशा परिस्थितीत मागील काही दिवसात झालेल्या पावसात रेल्वेच्या कामातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा गावाजवळ रेल्वेच्या एका पुलाची भिंत पडल्याने मातीचा भराव ढासळला. अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या पुलाची भिंतही कलली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमातून आणि काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर नगर रेल्वे विभागातील अभियंत्यांच्या द्विसदस्यीय पथकाने शनिवारी दिवसभर रेल्वेमार्गाच्या कामाची पाहणी केली.

या पाहणीच्या अहवालानंतर काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द रेल्वे विभाग कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वेमार्गाच्या उभारणीत पूल बांधणी, भराव, माती काम ही कामे मुख्य कंत्राटदाराने स्थानिक पातळीवर उप कंत्राटदारांना दिली आहेत. त्यात राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्यामुळे कामाचा दर्जा राखला गेला नसल्याचे सांगितले जात आहे.