जिल्ह्य़ातील मच्छीमार बांधवांच्या सुविधेसाठी बंदरांचा विकास करून मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन नगरविकास खात्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केले. गुहागर तालुक्यातील नवानगर मच्छीमार सह. संस्थेचा सुवर्णमहोत्सव आणि नवनिर्मित जेटीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनीषा जाधव, उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, जि. प. बांधकाम सभापती दत्ता कदम, शिक्षण सभापती विजय सालिम, महिला व बाल कल्याण सभापती अरुणा आंब्रे, गुहागर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. एन. घाटगे, सहा. पत्तन अभियंता एस. व्ही. घाटगे, तहसीलदार जीवन कांबळे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगांवकर, मच्छीमार नेते व जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्ताजी वणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्य़ातील बंदरांचा विकास, नवीन बंदरांची निर्मिती बंदरालगत ओटे बांधणे, मासळीविक्रीसाठी बाजारपेठ आदी विकासकामे मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. येत्या कालावधीत हर्णे, साखरीनाटे, विरकरवाडा बंदरांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बोऱ्याबंदर, साखरी आगार आणि पालशेत येथील बंदरांचाही विकास करण्यात येणार आहे. यामुळे मच्छीमार बांधवांना चांगली सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे मासोळी बाजार (फिश मार्केट) उभारण्यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येते तर उर्वरित १० टक्के वाटा लाभार्थीचा असतो. त्यातील ५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे युवकांना मासे विक्रीसाठी, वाहन खरेदी करण्यासाठी सहकार्य करण्याचाही विचार आहे. तसेच बोटींच्या गॅसकिटसाठी अनुदान देण्यात येणार आहे. शिवाय मच्छीमारांसाठी विमा योजनेचा हप्ता केंद्र व राज्य सरकार पूर्णत: भरते आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमार बांधवांनी नोंदणी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले.
नवनिर्मित जेटीच्या परिसरात पर्यटकांना माशांचे चविष्ट पदार्थ उपलब्ध करून दिल्यास पर्यटनवाढीसाठीही त्याचा उपयोग होऊन यातून तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होईल. कोकणाला मिळालेल्या निसर्गसौंदर्याच्या वरदानाला ग्रामस्थांनी शासकीय योजनांची जोड दिल्यास त्यांचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. नवानगर येथे संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेने त्वरित तयार करावा, असे निर्देशही पालकमंत्री जाधव यांनी दिले.
यावेळी डॉ. चोरगे, जालगावकर यांचीही समयोचित भाषणे झाली. नवानगर मच्छीमार सह. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन पालकमंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.