जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसह शिवसेनेचे आव्हान

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अकोला व वाशीम जिल्हय़ात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभेत ‘भारिप-बमसं’ला बाळापूरची एकमेव जागाही गमवावी लागल्याने जि.प. निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळेच स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात सक्रिय झाले आहेत.

तिकीटवाटपावरून नाराजी व बंडखोरीने भारिपच्या अडचणी वाढवल्या आहेत. काही ठिकाणी मनधरणी करण्यात यश आले असले, तरी अनेक ठिकाणी बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले. पक्षांतर्गत खदखद असून बंडखोरांना मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट व त्याअंतर्गत पंचायत समित्यांचे १०६ गण, तर वाशीम जिल्हा परिषदेचे ५२ गट व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी दोन्ही जिल्हय़ांत एकूण १५०९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरल्याने सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. अकोला जिल्हा परिषद गत दोन-अडीच दशकांपासून भारिप-बमसंचा अभेद्य गड मानला जातो. जिल्हा परिषद हे एकमेव सत्ताकेंद्र भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. अकोल्यात सर्वत्र भाजपचे वर्चस्व असताना आतापर्यंत जि.प.वर पक्षाचा सत्तेचा झेंडा फडकवता आला नाही. याची सल भाजप नेत्यांच्या मनात कायम आहे.

भारिप-बमसंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे या आमदारांवर भाजपच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आज, ४ जानेवारीला जिल्हय़ात डेरेदाखल होणार आहेत.

दुसरीकडे शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरली आहे. बाळापूरची जागा शिवसेनेने युतीत जिंकली. आता जि.प. निवडणुकीच्या निमित्ताने सेनेची खरी ताकद समोर येईल. जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्यावर शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आहे. सेनेने अकोटमध्ये प्रहारला सोबत घेतले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या निवडणुकीपूर्वीच मर्यादा उघड झाल्या. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांकडे उमेदवारच नव्हते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आघाडी केली. इतर पक्षांतील नाराजांना गळाला लावत त्यांना उमेदवारी दिली. मूर्तिजापूर तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला आहे.

वाशीममध्ये बहुरंगी लढत

’ वाशीम जिल्ह्य़ात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, भारिप-बमसं स्वबळावर रिंगणात असल्याने बहुरंगी लढतीचे चित्र आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी, तर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. संपूर्ण जिल्हय़ासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग आकारास येऊ शकला नाही. २२ गटांत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत, तर ३५ पेक्षा जास्त गटांत शिवसेनेचे उमेदवार विरोधात उभे ठाकले आहेत. वाशीम व मंगरुळपीर तालुक्यात १६ गटांत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली.

’ माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशीम जिल्हा जनविकास आघाडीनेदेखील रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यांत उमेदवार देऊन काँग्रेस, राष्ट्रवादीपुढील अडचणी वाढवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील तीनपैकी दोन जागांवर भाजप, तर एक जागा काँग्रेसने कायम राखली. रिसोड मतदारसंघात वर्चस्व कायम राखण्यात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाचा कस लागेल.