करोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबण्याचा सल्ला देऊनही समाजात वावरणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळली तर तत्काळ जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागाला माहिती देण्यासाठी सांगलीच्या तरुणांनी ‘कोव्हिड-१९ सांगली फायटर्स’नावाचे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपचे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून येत्या दोन दिवसात हे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. मात्र परदेश दौऱ्यावरून आलेले, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची लक्षणे दिसत नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना गृहबंदी (होम क्वोरंटाईन) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र या कालावधीत काही जण हातावर मारण्यात आलेले ‘होम क्वोरंटाईन’चे शिक्के लपवून, प्रसंगी ते धुऊन समाजात वावरत असल्याचे प्रकारही घडत आहेत.

अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तनात असले तरीही याला असलेल्या मर्यादांचा लाभ उठवला जात आहे. अशा व्यक्तींचा वावर संगणकाच्या पडद्यावर दिसावा यासाठी दीपक इंगवले, अक्षय पाटील, हर्षद पाटील, विश्वजीत जमदाडे, ज्ञानदेव जमदाडे, अभिजित पाटील या तरुणांनी ‘कोव्हिड-१९ सांगली फायटर्स’ या नावाने अ‍ॅप तयार केले आहे.

ठावठिकाणा समजणार

गृहबंदीचा सल्ला दिलेल्याच्या भ्रमणध्वनीमध्ये हे ‘अ‍ॅप डाऊनलोड’ केले की संबंधित व्यक्तीला ठरावीक अंतराची सीमा घालून देता येते. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून दर दहा मिनिटाला या व्यक्तीचा ठावठिकाणा संगणकावर नोंदला जातो. त्याने सीमोल्लंघन केले तर पोलिसांना तसा संदेश देणारी धून ऐकायला मिळते. जर  संबंधित व्यक्तीला शारीरिक त्रास होऊ लागला तर एक कळ दाबली तर त्याची सूचना आरोग्य विभागाला काही सेकंदात मिळते. जर भ्रमणध्वनी निर्धारित ठिकाणी ठेवून संबंधित व्यक्ती अन्य ठिकाणी गेल्यास दूरचित्र भाष्य यंत्रणेद्बारे खरा ठावठिकाणा समजू शकतो.

या अ‍ॅपचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस प्रमुख यांना दाखविण्यात आले असून जिल्हा प्रशासनाकडून अ‍ॅप वापरण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या दोन दिवसात अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.