पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक  आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल.  कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सांगली, कोल्हापुरात पुराचं थैमान होतं. आठ दिवसांपेक्षा जास्त काळ हा पूर ठाण मांडून होता. आता कुठे हळूहळू ही दोन शहरं आणि त्यांच्या आसपासची गावं सावरु लागली आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच या पुरामध्ये ज्यांची घरं पडली, वाहून गेली त्यांना त्यांची घरं सरकार बांधून देणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.