नियामक मंडळाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

पुणे : अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाध्यक्षाच्या निवडप्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार नियामक मंडळाचा असताना नाटय़ परिषदेच्या कार्यकारी मंडळाने परस्पर अध्यक्षनिवडीची घोषणा करण्याच्या कृतीला आक्षेप घेतला गेला आहे. नाटय़ परिषदेच्या घटनेनुसार पदाधिकारी काम करत नसल्याचा आरोप नियामक मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.

नियामक मंडळाला विश्वासात न घेता नाटय़ परिषदेच्या कार्यकारी समितीने आगामी शंभराव्या नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली, असा

आक्षेप नियामक मंडळाच्या सदस्यांनी घेतला आहे. विरोध व्यक्तीला नाही; परंतु १५ डिसेंबर रोजी नियामक मंडळाची बैठक होणार असताना घाईघाईने निवड करण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्नही नियामक मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

पटेल यांची निवड रद्द करण्याचा उद्देश नाही; परंतु नाटय़ परिषद घटनेनुसार काम करणार की नाही, हा प्रश्न नियामक मंडळाच्या आगामी बैठकीमध्ये उपस्थित करणार असल्याचे नाटय़ परिषदेचे कार्यवाह सतीश लोटके यांनी सांगितले. आपले नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती करीत नियामक मंडळाच्या अन्य सदस्यांनी या कृतीला विरोध दर्शविला आहे.

नाटय़ परिषदेचे सर्व काम प्रक्रियेनुसारच होत आहे. कार्यकारी समितीने एकमताने डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. नियामक मंडळाची बैठक ही केवळ औपचारिकता आहे, असे नाटय़ परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी सांगितले.

नाटय़ परिषदेची घटना काय सांगते?

* नाटय़ संमेलनाध्यक्ष परिषदेचे किमान दोन वर्षांपूर्वीपासून आजीव सभासद असणे आवश्यक आहे.

* नाटय़ संमेलनाध्यक्षाची निवड नियामक मंडळाकडूनच केली जाईल. मात्र त्यांना परिषदेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेण्याचा अधिकार नाही.

* कोणत्याही कारणाने अगर प्रसंगाने नाटय़ संमेलनाध्यक्ष पद हे रिकामे झाल्यास त्याबाबतचा निर्णय नियामक मंडळ घेईल.

* परिषदेचे प्रमुख कार्यवाह सर्व शाखांना आवाहन करून ३० सप्टेंबपर्यंत आगामी नाटय़ संमेलनाध्यक्ष पदासाठी नावे मागवतील. सर्व नावांतून कार्यकारी समिती आपली शिफारस नियामक मंडळाच्या सभेत विचारार्थ ठेवेल. शिफारस होऊन आलेल्या नावांतून नियामक मंडळ चर्चेअंती गुप्त मतदान पद्धतीने नाटय़ संमेलनाध्यक्षाची बहुमताने निवड करेल.